आता फेसबुकवरील फोटो व व्हिडीओ गुगल फोटोजवर थेट शेअर करता येणार

0

फेसबुकने आपल्या सर्व युजर्ससाठी त्यांच्या प्रोफाईलवरून फोटो आणि व्हिडीओजला थेट गुगल फोटोजवर शेअर करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

फेसबुकने गेल्या वर्षाच्या शेवटी फोटो व व्हिडीओजला थेट गुगल फोटोजवर शेअर करण्याची सुविधा मर्यादीत प्रमाणात उपलब्ध केली होती. फेसबुकने आधीच गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, ट्विटर आदींसह अन्य कंपन्यांसोबत डाटा ट्रान्सफर प्रोजेक्टवर काम सुरू केले होते. याच्या अंतर्गत या सर्व कंपन्यांनी आपापल्या मंचावरून अन्य मंचावर अगदी सुलभपणे डाटा ट्रान्सफर करण्याची सुविधा देण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने फेसबुकने आपल्या युजर्सला डाटा ट्रान्सफर करण्यासाठी टुल प्रदान करण्याची घोषणा केली होती. याच्या अंतर्गत कुणीही युजर आपल्या फेसबुक प्रोफाईलवरील फोटो आणि व्हिडीओ हे अगदी सुलभपणे गुगल फोटोजवर अपलोड करू शकतो. अर्थात, यासाठी स्वतंत्र अपलोडींगची करण्याची आवश्यकता नाही. या प्रकाराने फोटो व व्हिडीओची करण्यात आलेली ट्रान्सफर ही अतिशय सुरक्षित असल्याचा दावा फेसबुकने आधीच केला आहे.

दरम्यान, डिसेंबर २०१९ मध्ये फेसबुकने डाटा ट्रान्सफरची सुविधा देणारे हे टुल पहिल्यांदा आयर्लंडमध्ये प्रदान केले होते. साधारणपणे २०२०च्या मध्यापर्यंत सर्व युजर्स हे फिचर वापरू शकतील असे कंपनीने जाहीर केले होते. या अनुषंगाने हे टुल आता सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले असून याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून माहिती जाहीर करण्यात आली आहे. यानुसार संबंधीत टुलच्या मदतीने अतिशय सुरक्षितपणे छायाचित्रे/व्हिडीओ शेअर करता येणार आहेत.

कुणाही युजरला आपल्या फेसबुक अकाऊंटवरील फोटो वा व्हिडीओ आपल्या गुगल फोटोजच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करायचे असतील तर त्याने https://www.facebook.com/dtp या लिंकवर क्लिक करून पासवर्ड टाकत सांगितल्यानुसार स्टेप पूर्ण कराव्या. यात एका वेळेस प्रतिमा वा व्हिडीओ यापैकी एक सिलेक्ट करावे लागेल. यासाठी आवश्यक असणार्‍या परमीशन्स दिल्या की फोटो वा व्हिडीओ शेअरिंगची प्रक्रिया पूर्ण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here