छंदिष्टांसाठी फेसबुकचे स्वतंत्र अ‍ॅप

0

फेसबुकने होबी या नावाने नवीन अ‍ॅप सादर केले असून त्यात छंदिष्टांना आपले गुण जगासमोर मांडता येणार आहे.

फेसबुकच्या न्यू प्रॉडक्ट एक्सपेरिमेंटेशन टिमतर्फे होबी हे नवीन अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. पहिल्यांदा हे अ‍ॅप आयओएस प्रणालीसाठी लाँच करण्यात आले असून लवकरच याला अँड्रॉइडसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अ‍ॅपवरून फोटो आणि व्हिडीओ शेअर करता येणार आहे. फेसबुकची मालकी असणार्‍या इन्स्टाग्राममध्येही फोटो व व्हिडीओ शेअर करता येत असले तरी होबीचा इंटरफेस हा वेगळा आहे. खरं तर, आधीच खूप लोकप्रिय असणार्‍या पिंटरेस्ट या अ‍ॅपप्रमाणे होबीत सुविधा आहे. अर्थात, या माध्यमातून फेसबुक हे पिंटरेस्टची कॉपी करत असल्याची चर्चादेखील सायबर विश्‍वात रंगली आहे.

पिंटरेस्ट हे अ‍ॅप जगभरात लोकप्रिय आहे. यात कुणीही युजर आपल्याला हवे असणारे टास्क पिन करून ठेवू शकतो. होबी अ‍ॅप हे पिंटरेस्टची तंतोतंत कॉपी नसून यात काही प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत. यात बागकाम, स्वयंपाक, चित्रकला, हस्तकला आदी विविध छंदांवर आधारित व्हिडीओ तयार करून ते पीन करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. या अ‍ॅपमध्ये सोशल नेटवर्कींगपेक्षा एडिटर आणि ऑर्गनायझरचे फिचर्स जास्त प्रमाणात दिलेले आहेत.

गुगलने अलीकडेच तांगी या नावाने अ‍ॅप सादर केले असून यातदेखील विविध छंदांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. याच्या पाठोपाठ फेसबुकने छंदिष्टांसाठी होबी हे अ‍ॅप सादर केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. तांगीमध्ये शॉर्ट व्हिडीओ केंद्रस्थानी असले तरी होबीमध्ये मात्र यावर केंद्रबिंदू नसल्याची बाब भिन्न असली तरी आता गुगल व फेसबुक या दोन्ही कंपन्या नवनवीन मार्गांनी युजर्सला आकर्षीत करण्याचे प्रयत्न करत असल्याचे यातून अधोरेखीत झालेय हे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here