फेसबुकवर डार्क मोडचे आगमन

0

फेसबुकवर अखेर डार्क मोडचे आगमन झाले असून काही युजर्सला याचे नोटिफिकेशन मिळाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये सर्व युजर्सला हा मोड वापरता येणार आहे.

या वर्षात झालेल्या एफ-८ या परिषदेत मार्क झुकरबर्गने फेसबुकचे संकेतस्थळ आणि अ‍ॅपमध्ये अनेक बदल करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले होते. या रिडिझायनींगमध्ये डार्क मोडचाही समावेश असेल असे संकेत आधीच मिळाले होते. यानंतर गेल्या महिन्यात एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून डार्क मोड येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या अनुषंगाने आता काही युजर्सला डार्क मोड वापरायला मिळत असल्याची माहिती अँड्रॉइड पोलीस या टेक पोर्टलने एका वृत्ताच्या माध्यमातून दिली आहे. यानुसार जगभरातील काही फेसबुक युजर्सला डार्क मोड वापरण्याचे नोटिफिकेशन मिळत आहे. यात संबंधीत मोड हा नेमका कसा अ‍ॅक्टीव्हेट करावा ? याच्या स्टेप्सदेखील दिलेल्या आहेत. सध्या निवडक युजर्सलाच याचा वापर करता येत असला तरी लवकरच अपडेटच्या स्वरूपात ही सुविधा सर्वांना वापरता येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

अलीकडच्या काळात डार्क मोड लोकप्रिय झालेला आहे. यामुळे डोळ्यांना त्रास कमी होत असून विशेष करून रात्री उशीरापर्यंत वापर करणार्‍यांना याचा लाभ होत असतो. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यासाठी कमी बॅटरी लागत असते. सर्वात आधी ट्विटरने डार्क मोड दिला असून याचे अनुकरण फेसबुक मॅसेंजर, युट्युब आदींनी केले आहे. इन्स्टाग्रामवरही हा मोड येण्याचे संकेत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, फेसबुकवर आता लवकरच डार्क मोड येत असल्याची घटना लक्षणीय मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here