फेसबुकची लवकरच स्वतंत्र ऑपरेटींग सिस्टीम

0

फेसबुक स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम विकसित करत असून या माध्यमातून गुगलला टक्कर देण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

गुगलची अँड्रॉइड ही ऑपरेटींग सिस्टीम जगभरात क्रमांक एकवर असून ती अब्जावधी स्मार्टफोन्समध्ये वापरली जाते. अलीकडच्या काळात या प्रणालीचा विस्तार करण्यात आला असून वेअरेबल्ससह अन्य स्मार्ट उपकरणांसाठी याच्या विविध आवृत्त्या सादर करण्यात आल्या आहेत. मध्यंतरी हुआवे या चीनी कंपनीने अँड्रॉइडला टक्कर देण्यासाठी आपली स्वत:ची प्रणाली विकसित करणार असल्याची घोषणा केली आहे. आता फेसबुकदेखील आपली ऑपरेटींग सिस्टीम सादर करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. याबाबत द इन्फॉर्मेशन या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. अद्याप फेसबुकने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी प्रणाली विकसित करण्याचे काम गतीने सुरू असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

या वृत्तानुसार फेसबुकची ऑक्युलस आणि पोर्टल ही उपकरणे अँड्रॉइडपासूनच विकसित करण्यात आलेल्या प्रणालीवर चालतात. तथापि, भविष्यात अँड्रॉइड वा आयओएसवर अवलंबून न राहण्याचा निर्धार फेसबुकने केल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. यासाठी मार्क ल्युकॉव्हस्की यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन ऑपरेटींग सिस्टीम विकसित करण्यास प्रारंभ झालेला आहे. ल्युकॉव्हस्की यांनी आधी विंडोज एनटी या प्रणालीला विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली असल्याची बाब येथे लक्षात घेण्याजोगी आहे. दरम्यान, स्वतंत्र ओएससोबत फेसबुक स्वत:चे ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित ग्लासेस व व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंटही विकसित करत असल्याची माहिती या वृत्तामध्ये देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here