फेसबुकचा कायापालट; आता ग्रुप्सला प्राधान्यक्रम असणारे डिझाईन

0

फेसबुकचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून यावर ग्रुप्सला जास्त प्रमाणात प्राधान्य दिले जाणार असल्याची घोषणा मार्क झुकरबर्ग यांनी केली आहे.

फेसबुकच्या एफ ८ या परिषदेच्या बीजभाषणात मार्क झुकरबर्ग यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यातील सर्वात लक्षवेधी घोषणा ही फेसबुकबाबतच होती. वास्तविक पाहता, न्यूजफिड हा फेसबुकचा आत्मा असल्याची बाब आधीच सिध्द झाली आहे. न्यूज फिडबाबत फेसबुकने अनेक प्रयोग केले आहेत. या माध्यमातून युजर्सची एंगेजमेंट वाढविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकवर लवकरच नवीन डिझाईन येणार असल्याची घोषणा केली आहे. एफबी ५ या नावाने ही नवीन आवृत्ती सादर करण्यात आली असून हा बदल वेब आणि अ‍ॅप या दोन्ही प्रकारांमध्ये प्रदान करण्यात येणार आहे.

एफबी ५ ही नावातच नमूद असल्यानुसार फेसबुकची पाचवी आवृत्ती आहे. झुकरबर्ग यांच्या मते आजवर कधीही न झालेले बदल यात देण्यात आलेले आहेत. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे ग्रुप्सला जास्त प्रमाणात प्राधान्य देण्यात आलेले आहे. नवीन डिझाईनमध्ये ग्रुपसाठी स्वतंत्र विभाग ( टॅब) देण्यात आलेला असून यात ग्रुप्सचे वर्गीकरण, ग्रुप तयार करणे, सजेशन टुल आदी सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. यामुळे आता वरील भागात न्यूज फिड, ग्रुप्स, वॉच, नोटिफिकेशन आदी भाग दिसणार आहेत. यासोबत फेसबुकवर मीट न्यू फ्रेंड हे नवीन फिचरदेखील लवकरच मिळणार असून याच्या मदतीने व्हर्च्युअल पध्दतीत असणारी मैत्री ही प्रत्यक्षात होण्यासाठी सुविधा दिली जाणार आहे. यातील अजून एक लक्षणीय बदल म्हणजे फेसबुकची ओळख असणारा निळा रंग नवीन आवृत्तीतून कमी प्रमाणात दिसणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर लवकरच इव्हेंटस्साठी स्वतंत्र विभाग देण्यात येणार आहे.

एफबी ५ ही नवीन आवृत्ती आजपासून अँड्रॉइड व आयओएस प्रणालीसाठी सादर करण्यात आली असून येत्या काही दिवसांमध्ये डेस्कटॉप युजर्ससाठी हे अपडेट लागू करण्यात येणार आहे. डेस्कटॉपसाठीही फेसबुकची ओळख असणार्‍या निळ्या रंगाच्या ठिकाणी पांढरा पार्श्‍वभाग असणारी डिझाईन प्रदान करण्यात आली आहे. तर यातदेखील ग्रुप्सला प्राधान्य असणार आहे. तर वेब आवृत्तीसाठी डार्क मोडदेखील देण्यात येणार असल्याची घोषणा मार्क झुकरबर्ग यांनी केली. फेसबुकने आपल्या युजर्ससाठी मार्केटप्लेसवरील प्रॉडक्टचे शिपींग आणि त्याची देयके स्वीकारण्याची सुविधाही दिली आहे. याच्या माध्यमातून ई-कॉमर्सला प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

खालील अ‍ॅनिमेशनमध्ये फेसबुकची नवीन डेस्कटॉप आवृत्ती दर्शविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here