फेसबुकने मॅसेंजर रूम्स या नावाने व्हिडीओ चॅटींगसाठी स्वतंत्र अॅप सादर केले असून या झूमसह अन्य अॅप्सला टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे.
कोरोनाच्या आपत्तीमुळे वर्क फ्रॉम होम या कार्यसंस्कृतीला वेग आलेला आहे. या पार्श्वभूमिवर, सध्या झूम हे अॅप खूप लोकप्रिय झाले आहे. यासोबत गुगल मीट व चॅट, स्काईप आदींसारखे अॅपही मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. अर्थात मल्टीपल युजर्सची सुविधा असणारी व्हिडीओ चॅटींग आता प्रचंड प्रमाणात लोकप्रिय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा बदल स्वीकारत फेसबुकने आता व्हाटसअॅपच्या ग्रुप कॉलींगची सुविधा आठपर्यंत वाढवलेली आहे. यासोबत आता मॅसेंजर रूम्स या नावाने स्वतंत्र अॅप देखील सादर करण्यात आले आहे.
फेसबुकच्या मॅसेंजर रूम्स अॅपवरून ग्रुप व्हिडीओ कॉलींगची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. सध्या यावरून आठ युजर्स एकाच वेळी कॉल करू शकत असले तरी लवकरच ५० जणांपर्यंत ही मर्यादा वाढविण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कुणीही या अॅपच्या माध्यमातून आपल्या मित्रांना व्हिडीओ कॉलसाठी आमंत्रीत करू शकते. विशेष म्हणजे फेसबुकचा युजर नसलेल्यांनाही या व्हिडीओ चॅटींगमध्ये सहभागी होता येणार आहे.