फेसबुकवर येणार मीम मेकर !

0

सोशल मीडियात धमाल करणार्‍या मीमसाठी आपल्याला आता कोणत्याही अन्य टुलची गरज भासणार नसून फेसबुकवरच याची सुविधा मिळणार आहे.

कोणतेही छायाचित्र, अ‍ॅनिमेशन अथवा व्हिडीओला खमंग शब्दांची जोड देत अतिशय भन्नाट विनोदी पध्दतीत सादर करणारे मीम (meme) हे सोशल मीडियात तुफान लोकप्रिय आहेत. अगदी गाव पातळीवरील मुद्यांवरूनही या प्रकारचे मीम तयार करण्यात येत असून त्याला अलोट लोकप्रियतादेखील लाभली आहे. मीम तयार करण्यासाठी अनेक टुल्स आणि अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. याच्या मदतीने तयार केलेले मीम्स हे फेसबुक, ट्विटर, व्हाटसअ‍ॅप, इन्स्टाग्रामादी माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. आता मात्र मीमसाठी कोणत्याही थर्ड पार्टी टुलवर अवलंबून रहावे लागणार नाही. कारण आता फेसबुकने आपल्या युजर्ससाठी ही सुविधा प्रदान करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. फेसबुक Lol या नावाने नवीन टुल देणार असून निवडक टिनएजर्सच्या माध्यमातून याची चाचणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत टेकक्रंच या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार फेसबुक आपल्या मंचावरून टिन एजर्सची एंगेजमेंट अधिक प्रमाणात वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून Lol हे फिचर देण्यात येणार आहे. यामध्ये कुणीही अगदी सहजपणे मीम तयार करू शकणार आहे. यात ग्राफीक्स, विनोदी व्हिडीओ, लूप व्हिडीओ आणि अ‍ॅनिमेशन्स या प्रकारांमध्ये मीम करता येईल. यामध्ये फॉर यू, अ‍ॅनिमल्स, फेल्स व प्रँक्स आदी विविध वर्गवारी देण्यात येणार आहेत.

याच्या मदतीने टिन एजर्सची न्यूज फिड ही अधिक रंगतदार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे फिचर सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे. तर याला स्वतंत्र अ‍ॅपच्या स्वरूपात सादर करण्याची शक्यतादेखील काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तथापि, फेसबुकने याबाबत अद्याप तरी अधिकृत घोषणा केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here