फेसबुकच्या युजर्सला डार्क मोडसह नवीन डिझाईन सादर

0
Facebook

फेसबुकने आपल्या संगणकावरील युजर्ससाठी नवीन डिझाईन उपलब्ध केली असून यात बहुप्रतिक्षीत डार्क मोडचाही समावेश करण्यात आला आहे.

फेसबुकने आपल्या गेल्या वर्षीच्या एफ-८ या कॉन्फरन्समध्ये नवीन डिझाईनची चुणूक दाखविली होती. यानंतर काही युजर्सच्या माध्यमातून याची चाचणीदेखील घेण्यात आली होती. तर मध्यंतरी फेसबुकच्या युजर्ससाठी डार्क मोड सादर करण्यात येणार असल्याची माहितीदेखील समोर आली होती. या पार्श्‍वभूमिवर, आता फेसबुकच्या युजर्ससाठी हे नवीन डिझाईन सादर करण्यात येत आहे. काही युजर्सला टाईमलाईनवर याची सूचना मिळू लागली आहे. यात संबंधीत युजरने नवीन डिझाईनचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्थात पहिल्या टप्प्यात युजर याला स्वेच्छेने वापरू शकणार आहे. यात फेसबुकची आधीची डिझाईन वापरण्याची सुविधादेखील दिलेली आहे. तथापि, काही दिवसांनी नवीन डिझाईन सर्व युजर्सला वापरण्यासाठी मिळणार असून अर्थात, आधीची डिझाईन काळाच्या पडद्याआड जाणार आहे. नवीन डिझाईनमध्ये आधीच्या तुलनेत मोठे फाँट आणि ठसठशीत आयकॉन्स आहेत. यात व्हाईट स्पेसचा वापर जास्त प्रमाणात करण्यात आलेला आहे. आजवर स्टेटस अपडेटच्या खाली स्टोरीज हा भाग होता. यापुढे मात्र स्टेटसच्या वर स्टोरीजचा भाग असणार आहे. यात नवीन मेन्यू बार दिलेला असेल. यात ग्रुप्सचाही समावेश करण्यात आलेला आहे. तर आधीप्रमाणेच यात वॉच, मार्केटप्लेस, इव्हेंटस आदींचा अंतर्भावदेखील असणार आहे.

फेसबुकच्या नवीन डिझाईनमध्ये सर्वात लक्षणीय बाब म्हणजे अर्थातच डार्क मोड होय. याच्या मदतीने कुणीही रात्रीच्या वेळी अथवा युजरला हव्या त्या वेळेला डार्क मोड ऑन करून फेसबुकचा वापर करू शकणार आहे. यामुळे डोळ्यांवर कमी प्रमाणात ताण येणार असल्याने युजर्सची याला पसंती मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here