फेसबुकच्या स्टोरीप्रमाणे २४ तासांनी आपोआप गायब होणार्या अपडेटची सुविधा देणारे फ्लिट हे फिचर आता ट्विटरच्या भारतीय युजर्सला देखील उपलब्ध करण्यात आले आहे.
फेसबुक व इन्स्टाग्रामची स्टोरी व व्हाटसअॅपच्या स्टेटसला युजर्सची मोठी पसंती मिळाली आहे. यात कुणीही छायाचित्र, व्हिडीओ वा अॅनिमेशन अपलोड करू शकतो. हे अपडेट २४ तासांनी आपोआप गायब होते. हे फिचर मूळचे स्नॅपचॅटचे असून याची फेसबुकसह अन्य कंपन्यांनी कॉपी केली आहे. या अनुषंगाने ट्विटरने देखील मार्च महिन्याच्या प्रारंभी फ्लिट हे नवीन फिचर सादर केले होते. यात स्टोरी फिचरची तंतोतंत कॉपी करण्यात आल्याचे दिसून आले होते. मोजक्या देशांमधील युजर्ससाठी हे लाँच करण्यात आले होते. प्रारंभी याला ब्राझीलमध्ये तर नंतर अन्य देशांमध्ये सादर करण्यात येणार असल्याचे ट्विटरने सूचित केले होते. या अनुषंगाने आता ही सुविधा भारतीय युजर्सलाही उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती ट्विटरतर्फे देण्यात आली आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कायवेन बेकपोर यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.
फ्लिटस् हे ट्विटच असणार आहे. तथापि, याला रिट्विट, लाईक अथवा रिप्लाय आदी करता येणार नाहीत. तर याला थेट डायरेक्ट मॅसेजच्या माध्यमातून दुसरा युजर रिअॅक्ट करू शकेल. तसेच फ्लिट हे ट्विट युजरच्या टाईमलाईनमध्ये दिसणार नसून याला युजरच्या अवतारवर क्लिक करून पाहता येणार आहे. हे ट्विट बरोबर २४ तासांनी आपोआप नष्ट होणार आहे. यात युजर पोस्ट, इमेज अथवा व्हिडीओ अपडेट करू शकणार आहे. भारतातील युजर्सला येत्या काही दिवसांमध्ये क्रमाक्रमाने याचे अपडेट मिळणार असल्याची माहिती बेकपोर यांनी दिली आहे.
Namaste! Starting today, Fleets are coming to India. If you’re in India, check it out and let us know what you think! #FleetsFeedback 🇮🇳 pic.twitter.com/U6QiHynm1U
— Kayvon Beykpour (@kayvz) June 9, 2020