फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलची व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा लवकरच सुरू होत असून या माध्यमातून अमेझॉनच्या प्राईम व्हिडीओला टक्कर देण्याचे या कंपनीचे मनसुबे स्पष्ट झाले आहेत.
फ्लिपकार्टच्या आगामी व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवेबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. मध्यंतरी या कंपनीने हा प्रोजेक्ट सोडून दिल्याची माहितीसुध्दा समोर आली होती. तथापि, आता ताज्या माहितीनुसार फ्लिपकार्टच्या या सेवेविषयी लवकरच घोषणा होऊ शकते. याबाबत मनीकंट्रोल या पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. यानुसार, व्हिडीओ स्ट्रीमिंगच्या क्षेत्रात थेट पदार्पण करण्याऐवजी अन्य कंटेंट प्रोव्हायडरसोबत करार करून याला लाँच करण्याची रणनिती फ्लिपकार्टने आखली आहे.
फ्लिपकार्टची प्रतिस्पर्धी कंपनी असणार्या अमेझॉन इंडियाला या माध्यमातून तगडे आव्हान उभे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या कंपनीच्या अमेझॉन प्राईम व्हिडीओ या सेवेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. अमेझॉनच्या अमेझॉन प्राईम या सेवेत याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. याच प्रकारे आपल्या व्हिडीओ स्ट्रीमिंगला फ्लिपकार्ट प्लस या प्रिमीयम सेवेत सहभागी करण्याचे फ्लिपकार्टचे मनसुबे असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, फ्लिपकार्टची स्ट्रीमिंग सेवा सुरू झाल्यास या क्षेत्रातील स्पर्धा अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडीओ व हॉटस्टार आदींसारख्या आघाडीच्या सेवांना यामुळे आव्हान निर्माण होऊ शकते.