सॅमसंगने अलीकडेच अनावरण केलेल्या गॅलेक्सी नोट १० लाईट या स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहे.
सॅमसंगने या महिन्याच्या प्रारंभी गॅलेक्सी एस१० लाईट आणि गॅलेक्सी नोट १० लाईट या मॉडेल्सचे अनावरण केले होते. यातील नोट १० लाईट हे मॉडेल आता भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. याचे ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट अनुक्रमे ३८,९९९ आणि ४०,९९० रूपये या मुल्यांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. ऑरा ग्लो, ऑरा ब्लॅक आणि ऑरा रेड या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये हे मॉडेल ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करता येणार आहे.
गॅलेक्सी नोट १० लाईट या मॉडेलमध्ये ६.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २४०० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा एज-टू-एज या प्रकारातील व सेंटर होल पंच कॅमेरा असणारा डिस्प्ले प्रदान करण्यात आलेला आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यात प्रत्येकी १२ मेगापिक्सल्सच्या तीन कॅमेर्यांचा समावेश आहे. यातील एक प्रमुख कॅमेरा असून याला अल्ट्रा वाईड लेन्स आणि फिक्स्ड फोकस मॅक्रो लेन्सयुक्त कॅमेर्यांची जोड देण्यात आलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ३२ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यातील बॅटरी ही फास्ट चार्जींगयुक्त ४५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हे मॉडेल अँड्रॉइड १० आवृत्तीवर चालणारे असून यावर वनयुआय हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन नोट सेरीजमधील असल्याने यासोबत ब्लु-टुथ कनेक्टीव्हिटी असणारा स्टायलास पेन देण्यात येणार आहे. याच्या मदतीने डिस्प्लेवर रेखाटन करता येणार आहे.