अँड्रॉइडला टक्कर ? : गुगलची नवीन प्रणाली लाँच

0

गुगलने फुशिया या नावाने नवीन ऑपरेटींग सिस्टीम सादर केली असून या माध्यमातून अँड्रॉइडला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

गत अनेक महिन्यांपासून गुगलतर्फे नवीन ऑपरेटींग सिस्टीमवर काम सुरू असल्याची माहिती आधीच जगजाहीर झाली होती. अँड्रॉइड आणि क्रोम ओएस या दोन्ही प्रणालींची जागा ही नवीन सिस्टीम घेणार असल्याचे सुध्दा अनेक तज्ज्ञांनी दावे केले होते. या पार्श्‍वभूमिवर, गुगलने फुशिया या नावाने नवीन प्रणालीला लाँच केले आहे. पहिल्या टप्प्यात डेव्हलपर्ससाठी याला सादर करण्यात आले असून लवकरच युजर्ससाठी ही प्रणाली उपलब्ध करण्यात येईल असे मानले जात आहे. यासाठीचे संकेतस्थळदेखील लाईव्ह करण्यात आले आहे. यावर फुशिया ही मुक्तस्त्रोत म्हणजेच ओपनसोर्स या प्रकारातील ऑपरेटींग सिस्टीम असल्याचे नमूद केलेले आहे. ही लिनक्सवर नव्हे तर अत्यंत लवचीक अशी प्रणाली असल्याचेही यावर सांगण्यात आले आहे. या संकेतस्थळावर फुशियाबाबतची प्राथमिक माहिती दिलेली असून याच्या मदतीने अ‍ॅप कसे विकसित करावेत याबाबतही उहापोह करण्यात आला आहे.

जगभरात अँड्रॉइड ही पहिल्या क्रमांकाची मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम आहे. पृथ्वीवरील बहुतांश स्मार्टफोन्स याच प्रणालीवर चालणारे आहेत. यातच अँड्रॉइडला अन्य कोणतीही ऑपरेटींग प्रणाली आव्हान देण्याच्या स्थितीत नसतांना गुगलने फुशियाच्या माध्यमातून आपल्याच प्रणालीस पर्याय उभा करण्याचा केलेला प्रयत्न हा आश्‍चर्यकारक मानला जात आहे. तथापि, तज्ज्ञांच्या मते, संगणक आणि स्मार्टफोन या दोन्ही उपकरणांसाठी एकीकृत प्रणाली म्हणून फुशियाला विकसित करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात अँड्रॉइड आणि क्रोम ओएस यांच्या ऐवजी फुशियाचा वापर होणार आहे. तथापि, जगात अग्रस्थानी असणार्‍या अँड्रॉइडला आव्हान देण्याचा हा प्रयत्न अनेकांच्या कुतुहलाचा विषय बनलाय हे मात्र निश्‍चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here