सोशल नेटवर्कींगच्या क्षेत्रात गुगलची पुन्हा चाचपणी

0

गुगलने शूलेस या नावाने नवीन अ‍ॅपची चाचणी सुरू केली असून या माध्यमातून पुन्हा एकदा सोशल नेटवर्कींगच्या क्षेत्रात चाचपणीस प्रारंभ केल्याचे मानले जात आहे.

गुगलने अनेकदा प्रयत्न करूनदेखील सोशल नेटवर्कींगमध्ये या कंपनीला आपले बस्तान बसवता आले नाही. अर्थात, असे असले तरी गुगलने या क्षेत्रात प्रयत्न करण्याचे काही सोडले दिसत नाहीत. या अनुषंगाने आता शूलेस या नावाने नवीन अ‍ॅपची चाचणी घेण्यास प्रारंभ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लवकरच हे अ‍ॅप सर्व युजर्ससाठी सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

शूलेसची कार्यप्रणाली नेमकी कशी असेल याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, याला प्रयोगात्मक अवस्थेत वापरणार्‍या युजर्सनी दिलेल्या माहितीनुसार समान आवडी-निवडी असणार्‍या युजर्सला कनेक्ट करण्याचे काम हे अ‍ॅप करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या हे अ‍ॅप फक्त इनव्हाईट ओन्ली या प्रकारात उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये लूप्स या नावाने विविध विभाग देण्यात आलेले आहेत. लूप्स म्हणजे इव्हेंट अथवा अ‍ॅक्टीव्हिटीज होय. कुणालाही नवीन लूप तयार करण्यासह आधीच्या लूपमध्ये सहभागी होण्याची सुविधा यात देण्यात आलेली आहे. अर्थात, लूपमध्ये सहभागी होण्याआधी संबंधीत युजरचे व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया यात देण्यात आलेली आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात येणार असून वेब आवृत्तीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here