गुगलचे पिक्सल ३ ए आणि ३ ए एक्सएल स्मार्टफोन्स सादर

0

गुगलने कधीपासूनच उत्सुकता लागून असणार्‍या पिक्सल मालिकेतील ३ ए आणि ३ ए एक्सएल हे दोन स्मार्टफोन्स सादर केले आहेत.

भारतातही मिळणार

गुगलच्या वार्षिक आय/ओ परिषदेत नेहमी महत्वाच्या घोषणा होत असतात. यामुळे या वर्षीच्या परिषदेतील घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यातही पिक्सल मालिकेतील नवीन मॉडेल्सबाबत उत्सुकता होती. याबाबत अनेक लीक्सदेखील समोर आले होते. या अनुषंगाने आय/ओ परिषदेच्या पहिल्या दिवशी पिक्सल ३ ए आणि ३ ए एक्सएल हे दोन मॉडेल्स सादर करण्यात आले. नावातच नमूद असल्यानुसार हे पिक्सल मालिकेतल्या तिसर्‍या पिढीतील मॉडेल्स आहेत. भारतातही हे मॉडेल्स लाँच करण्यात आले असून या दोन्ही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे ३९,९९९ आणि ४४,९९९ रूपये आहे. १५ मे पासून हे मॉडेल्स ग्राहकांना प्रत्यक्षात खरेदी करता येणार आहेत. तथापि, याची आजपासूनच नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.

बहुतांश फिचर्स समान

पिक्सल ३ ए आणि ३ ए एक्सएल या दोन्ही मॉडेल्समधील बहुतांश फिचर्स विशेष करून हार्डवेअर हे एकसारखे असून फरक हा आकारमान व बॅटरीत आहे. पिक्सल ३ ए मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा, फुल एचडी क्षमतेचा व १८:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले आहे. तर ३ ए एक्सएल मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा याच प्रकारातील व १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्हीवर ड्रॅगन टेलचे संरक्षक आवरण दिलेले आहे. पिक्सल ३ ए मॉडेलमध्ये ३,००० तर ३ ए एक्सएलमध्ये ३७०० मिलीअँपिअर क्षमतांच्या बॅटरीज असून दोन्हीमध्ये फास्ट चार्जींगचा सपोर्ट दिलेला आहे. या बॅटरीज एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ३० तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर १५ मिनिटांच्या चार्जींगमध्ये यातून तब्बल ७ तासांइतके चार्जींग होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दर्जेदार कॅमेरे

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६७० हा वेगवान प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी आहे. यात अतिशय दर्जेदार कॅमेरे असून मागील बाजूस १२ तर समोर ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असणार आहे. यामध्ये नाईट साय, प्लेग्राऊंड, पोर्ट्रेट मोड, एचडीआर आदी फिचर्स दिलेले आहेत. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाची छायाचित्रे काढता येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात ऑडिओ जॅकदेखील दिलेली आहे. हे दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे असून याला लवकरच क्यू या आवृत्तीचे अपडेट मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here