गुगल पिक्सल ४ व पिक्सल ४ एक्सएलचे अनावरण : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

गुगलने अखेर पिक्सल ४ आणि पिक्सल ४ एक्सएल या उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सचे अनावरण केले असून यात ड्युअल रिअर कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पिक्सल मालिकेतील स्मार्टफोन्सबाबत उत्सुकता लागली होती. अखेर एका शानदार कार्यक्रमात पिक्सल ४ आणि पिक्सल्स ४ एक्सएल या मॉडेल्सला सादर करण्यात आले. गुगलच्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडच्या ताज्या आवृत्तीला सर्वप्रथम वापरण्याची सुविधा असते. याशिवाय, यातील कॅमेरा अतिशय दर्जेदार असतो. हाच लौकीक पिक्सल ४ आणि पिक्सल्स ४ एक्सएल या दोन्ही मॉडेल्समध्ये जपण्यात आलेला आहे. याशिवाय, यात अन्य काही विशेष फिचर्स असून यामुळे युजर्सची याला पसंती मिळू शकते. या दोन्ही मॉडेल्समधील बहुतांश फिचर्स समान असून पिक्सल्स एक्सएल या मॉडेलमध्ये थोडा मोठा डिस्प्ले व जास्त क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.

( खाली पहा : पिक्सल ४ आणि पिक्सल्स ४ एक्सएलच्या वैशिष्टयपूर्ण फिचर्सची माहिती देणारा व्हिडीओ. )

पिक्सल ४ या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्ले आहे. तर पिक्सल ४ एक्सएल या मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि ३०४० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले आहे. हे दोन्ही डिस्प्ले ९० हर्टझ् रिफ्रेश रेट असणारे आहेत. यातील पहिल्या मॉडेलमध्ये २८०० तर दुसर्‍या ३७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. हे अपवाद वगळता उर्वरित सर्व फिचर्स हे समान आहेत.

गुगल पिक्सल ४ व पिक्सल ४ एक्सएल या मॉडेल्समध्ये रडार सेन्सरने युक्त असणारे मोशन सेन्स हे विशेष फिचर दिलेले आहे. याच्या मदतीने हाताची हालचाल करून डिस्प्लेवर सुरू असणारा म्युझिक ट्रॅक बदलणे, कॉल वा अलार्मची रिंग म्युट करणे आदी फंक्शन्सचा वापर करता येतो. यात अद्ययावत गुगल असिस्टंटला संलग्न करण्यात आलेले आहे. याच्या मदतीने व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीचा उपयोग करून विविध फंक्शन्सचा जलद गतीने वापर शक्य आहे. यात रेकॉर्डर अ‍ॅप हे प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आलेले आहे. याच्या मदतीने हा फोन फ्लाईंग मोडेमध्ये असतांनाही व्हाईस रेकॉर्डींग करता येणार आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात रेकॉर्ड केलेल्या वाक्यांना व्हाईस-टू-टेक्स्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने वाचता येणार आहे. पहिल्यांदा ही सुविधा इंग्रजीसाठी असली तरी लवकरच अन्य भाषांचा यात समावेश करण्यात येणार आहे.

गुगल पिक्सल ४ व पिक्सल ४ एक्सएल या दोन्ही मॉडेल्सच्या मागील बाजूस १६ आणि १२.२ मेगापिक्सल्स क्षमतेच्या ड्युअल कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यात एचडीआर प्लस या तंत्रज्ञानाचा समावेश असल्याने याच्या मदतीने अगदी सजीव वाटणार्‍या प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात नाईट साय हे फिचर असल्याने रात्री आणि अंधुक उजेडातील प्रतिमाही चांगल्या येतील. यात व्हाईट बॅलन्सींग आणि पोर्ट्रेट मोडचा अंतर्भावदेखील करण्यात आलेला आहे. तर या दोन्ही मॉडेल्समधील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. उर्वरित फिचर्सचा विचार करता यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५५ हा गतीमान प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ६ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके आहे. तूर्तास हे दोन्ही मॉडेल्स भारतात मिळणार नाहीत. तथापि, अमेरिका, कॅनडासह अन्य देशांमध्ये याची विक्रीपूर्व नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. यातील पिक्सल ४ मॉडेलचे मूल्य ७९९ तर पिक्सल ४ एक्सएल मॉडेलचे मूल्य ८९९ डॉलर्स इतके आहे.

( खाली पहा : मोशन सेन्स फिचरची कार्यप्रणाली दर्शविणारे अ‍ॅनिमेशन.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here