आता रडार प्रमाणेच ‘सोडार’ ! : फिजीकल डिस्टन्सींगसाठी गुगलचे टुल

0

गुगलने ‘सोडार’ या नावाने नवीन टुल लाँच केले असून याच्या मदतीने सोशल (फिजीकल) डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करण्यासाठी एक आभासी रिंग उभारण्याची सुविधा दिलेली आहे.

सध्या जगभरात कोविड-१९ विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात उदभवला आहे. याचा प्रतिकार करण्यासाठी अजूनही परिणामकारक औषधी नसल्याने अनेक देशांनी लॉकडाऊन केला असून फिजीकल (सोशल) डिस्टन्सींग पाळण्याची सक्ती करण्यात येत आहे. या अनुषंगाने अनेक कंपन्यांनी नवनवीन टुल्स सादर करण्यास प्रारंभ केलेला आहे. यात आता गुगलची भर पडली आहे. गुगलने आता ‘सोडार’ या नावाने नवीन टुल लाँच केले आहे. यात विस्तारीत सत्यता म्हणजेच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीचा वापर करण्यात आला आहे. क्रोम ब्राऊजरमधून याचा वापर करण्यात येणार आहे. हे टुल आपल्या भोवती गोलाकार दोन मीटर म्हणजे सहा फुटांपर्यंत एक व्हर्च्युअल म्हणजे आभासी रिंग उभारते. हे अंतर जगभरात फिजीकल डिस्टन्सींगचे मानक म्हणून वापरले जाते. या अनुषंगाने सोडार हे युजरच्या स्मार्टफोनमधील कॅमेर्‍यातून त्याला हे अंतर दर्शविते. सहा फुटांच्या अंतराच्या आता कुणी आल्यास युजरला याचा अलर्ट मिळतो. हे टुल एक्सपेरीमेंटल असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. वेबएक्सआर या तंत्रज्ञानाचा वापर करून याला विकसित करण्यात आले आहे.

आपल्या स्मार्टफोनमध्ये सोडार वापरण्यासाठी https://sodar.withgoogle.com या संकेतस्थळावर जावे लागेल. जर आपण लॅपटॉप वा संगणकावरून वापर करत असाल तर या वेबसाईटवरील क्युआर कोड स्कॅन करून आपल्या स्मार्टफोनमधील क्रोम ब्राऊजरमध्ये हे टुल ओपन होईल. यानंतर कुणीही स्मार्टफोनमधील कॅमेर्‍याच्या मदतीने कुणीही सोडार वापरू शकतो. ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी हे तंत्रज्ञान विविध क्षेत्रांमध्ये परिणामकारक पध्दतीत वापरता येत असल्याचे आधीच अधोरेखीत झालेले आहे. यात आता सोडार या नवीन टुलच्या मदतीने भर पडली आहे. हे टुल अँड्रॉइड स्मार्टफोनवरच वापरता येणार असल्याचे गुगलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

खालील व्हिडीओत सोडारच्या कार्यप्रणालीची झलक दर्शविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here