गुगलची ‘स्पीच-टू-स्पीच’ या प्रकारातील अनुवाद करणारी प्रणाली

0

गुगलने अतिशय परिणामकारकरित्या शब्दांपासून शब्द या प्रकारात अगदी रिअल टाईम अनुवाद करण्याची सुविधा देणारे ट्रान्सलेटोट्रॉन हे टुल सादर केले आहे.

गुगलने ट्रान्सलेशन अर्थात अनुवादासाठी आधीच टुल्स प्रदान केले आहेत. याचा मोठ्या प्रमाणात वापरदेखील करण्यात येत आहे. आता अनुवादाला नवीन आयाम प्रदान करण्यासाठी ट्रान्सलेटोट्रॉन या नावाने ‘स्पीच-टू-स्पीच’ या प्रकारातील अनुवादाची सुविधा देण्यात आली आहे. अर्थात आता कुणीही एखाद्या भाषेत बोलत असेल तर समोरचा व्यक्ती त्या शब्दांना दुसर्‍या भाषेत ऐकू शकतो.

गुगलने आपल्या ‘टेक्स्ट-टू-टेक्स्ट’ या प्रकारातील अनुवादात कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. यातून दिवसेंदिवस अतिशय उत्तम प्रकारे अनुवादाची सुविधा देण्यात आलेली आहे. मात्र याच्याही पलीकडे जात आता शब्दांना तात्काळ दुसर्‍या भाषेत अनुवादीत करण्यासाठी ट्रान्सलेटोट्रॉन सादर करण्यात आले असून याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. यानुसार ट्रान्सलेटोट्रॉन हे टुल सिक्वेन्स-टू-सिक्वेन्स नेटवर्क प्रणालीवर आधारित आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात बोलणार्‍या व्यक्तीच्याच आवाजात समोरच्या व्यक्तीला अनुवाद ऐकू येणार आहे. या टुलच्या मदतीने करण्यात येणार्‍या अनुवादाच्या ध्वनीचे सँपल्सदेखील गुगलने आपल्या या ब्लॉगपोस्टमध्ये दिलेले आहेत. याबाबत सविस्तर रिसर्च पेपरदेखील प्रकाशित करण्यात आलेला आहे. सध्या ही प्रणाली प्राथमिक अवस्थेत असली तरी येत्या काही दिवसांमध्ये या टुलला सर्वांसाठी कार्यान्वित करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत. अर्थात, लवकरच कुणालाही ही सुविधा आपल्या स्मार्टफोनमध्येच वापरता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here