गुगल नेस्ट हब मॅक्सची घोषणा

0

गुगलने नेस्ट हब मॅक्स हा स्मार्ट डिस्प्ले सादर करण्याची घोषणा केली असून याच्या माध्यमातून घरासाठी एक उपयुक्त उपकरण लाँच करण्यात आले आहे.

गुगलच्या आय/ओ २०१९ या परिषदेत विविध घोषणा करण्यात आल्या. यात नेस्ट हब मॅक्सचाही समावेश आहे. हा एक स्मार्ट डिस्प्ले असून यात विविध उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील १०.५ इंच आकारमानाच्या डिस्प्लेला नेस्ट कॅमेरा संलग्न करण्यात आलेला आहे. याच्या मदतीने हे उपकरण सिक्युरिटी कॅमेरा म्हणून काम करू शकते. अर्थात, याच्या परिसरातील हालचाली या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून युजर्सला पाहता येतील. यातील कॅमेरा सुरू असतांना लाईट लागतो. हा कॅमेरा अथवा मायक्रोफोन बंद करण्याची सुविधाही यात दिली आहे. यामध्ये फेस मॅच फिचर दिलेले आहे. यामुळे युजरच्या चेहर्‍यातून ऑथेंटीकेशन करण्याची सुविधा यात प्रदान करण्यात आलेली आहे. यात कुणीही युजर हा आपल्यासाठी पर्सनलाईज्ड होमपेज बनवू शकतो. यात त्याला आलेले संदेश, त्याने सेट केलेले अलर्ट, रिमाइंडर्स आदींसह त्याला सुचविण्यात आलेले म्युझिक ट्रॅक, दूरचित्रवाणी कार्यक्रम आदींची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. या फेस आयडीतून जमा करण्यात आलेली माहिती ही स्थानिक सर्व्हरवर संग्रहीत करण्यात आल्यामुळे ती गोपनीय राहणार असल्याचे गुगलने नमूद केले आहे.

नेस्ट हब मॅक्स या उपकरणाच्या डिस्प्लेवर कुणीही युट्युब व्हिडीओचा आनंद घेऊ शकणार असून याला डिजीटल फोटो फ्रेम म्हणूनदेखील वापरता येणार आहे. यामध्ये जेस्चर कंट्रोल प्रणाली असल्याने कुणीही फक्त हात हलवून यावर सुरू असणारे संगीत अथवा व्हिडीओ पॉज करू शकतो. यावरून गुगलच्या ड्युओ अ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात विविध स्मार्ट होम उपकरणांना कनेक्ट करता येणार आहे. गुगल असिस्टंटचा सपोर्ट असणारी जगभरातील ३५०० कंपन्यांची तब्बल ३० हजारांपेक्षा जास्त उत्पादने याला संलग्न करता येणार असल्याची माहिती गुगलने दिली आहे. अर्थात, व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने याचा वापर करता येणार आहे.

नेस्ट हब मॅक्स हे उपकरण २९९ डॉलर्स ( सुमारे २०,९०० रूपये) मुल्यात उपलब्ध करण्यात येणार आहे. तर आधीच बाजारपेठेत उपलब्ध असणारे नेस्ट हे उपकरण आता १२९ डॉलर्सला (अंदाजे ९००० रूपये) मिळणार आहे.

पहा : नेस्ट हब मॅक्स उपकरणाच्या कार्यप्रणालीची माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here