टोटोक मॅसेंजरवर पुन्हा हेरगिरीचा आरोप; प्ले स्टोअरवरून हटविले !

0

टोटोक मॅसेंजर अ‍ॅप युजर्सची गोपनीय माहिती चोरी करत असल्याच्या कारणावरून गुगल प्ले स्टोअरवरून याला हटविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

टोटोक मॅसेंजर अ‍ॅप युजर्सची गोपनीय माहिती जमा करत असल्याचा आरोप आधीच करण्यात आला होता. यावरून हे अ‍ॅप वादाच्या भोवर्‍यात सापडले असून गुगल प्ले स्टोअरवरून याला हटविण्यात आले होते. काही दिवसांनी हे अ‍ॅप पुन्हा प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले. दरम्यान, अलीकडे हे अ‍ॅप युजरची गोपनीय माहिती चोरून मध्यपूर्वेतील युनायटेड अरब अमिरात या देशाकडे सुपुर्द करत असल्याची धक्कादायक बाब आढळून आली आहे. याच कारणावरून गुगल प्ले स्टोअरने हे अ‍ॅप हटविले आहे.

टोटोक मॅसेंजर या अ‍ॅपची निर्मिती ब्रीज होल्डींग या कंपनीने केले असून त्यांचे मुख्यालय अबूधाबी येथे आहे. टोटोक मॅसेंजरवर चॅटींगसह व्हाईस आणि व्हिडीओ कॉलींगची सुविधा देण्यात आलेली आहे. जगभरात या अ‍ॅपचे युजर्स मोठ्या प्रमाणात आहेत. तथापि, ब्रीज होल्डींग कंपनी या अ‍ॅपच्या प्रत्येक युजरची गोपनीय माहिती ही संयुक्त अरब अमीरात अर्थात युएई सरकारकडे देत असल्याचे आढळून आले आहे. ही कंपनी डार्क मॅटर या कंपनीशी संलग्न आहे. डार्क मॅटरची सायबर हेरगिरीबाबत अमेरिकेच्या एफबीआयतर्फे आधीच चौकशी सुरू आहे. या सर्व बाबींचा विचार करून हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटविण्यात आले आहे. अर्थात, कंपनीच्या संकेतस्थळासह अन्य थर्ड पार्टीज वेबसाईटवरून हे अ‍ॅप इन्स्टॉल करून वापरणे शक्य आहे. तथापि, टोटोक मॅसेंजरचा वापर हा धोकेदायक असल्याचा इशारा सायबरतज्ज्ञांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here