हाईकमोजी फिचर सर्वांसाठी उपलब्ध

0

हाईकने आपल्या युजर्ससाठी हाईकमोजी हे फिचर प्रदान केले असून याच्या मदतीने कुणीही पर्सनलाईज्ड डिजीटल अवतार तयार करून वापरू शकणार आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हाईकच्या युजर्ससाठी हाईकमोजी हे फिचर बीटा अर्थात प्रयोगात्मक अवस्थेत प्रदान करण्यात आले होते. यानंतर आजपासून ही सुविधा सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती कंपनीचे प्रमुख केव्हीन भारती मित्तल यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे. अनेक अ‍ॅप्सवर पर्सनलाईज्ड डिजीटल अवतार तयार करून वापरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. हाईकमोजीमध्ये याचे पूर्णपणे भारतीयकरण करण्यात आले आहे. म्हणजेच एका अर्थाने हाईकमोजी ही पहिली हायपर-लोकल इमोजी असेल असा दावा त्यांनी केला आहे.

हाईकमोजीमध्ये कृत्रीम बुध्दीमत्ता अर्थात आर्टीफिशीयल इंटिलेजीयन्स आणि मशीन लर्नींगचा वापर करण्यात आलेला आहे. याच्या माध्यमातून तयार करण्यात येणार्‍या इमोजीतील चेहरा-मोहरा, हेयर स्टाईल, वेशभूषा आदी बाबी पूर्णपणे भारतीय असल्याची बाब लक्षणीय आहे. यात प्रत्येक युजरला त्याची भाषा आणि अन्य आवडी-निवडीशी सुसंगत असे स्टीकर्सचे जवळपास १०० पर्याय उपलब्ध आहेत. याला हव्या त्या प्रकारे कस्टमाईज्ड करण्याची सुविधा दिलेली आहे. कुणीही युजर स्टीकर या विभागात जाऊन याला तयार करू शकतो. यासाठी युजरने सेल्फी घेऊन त्यावर हाईकमोजी बनविण्याची प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. ही प्रक्रिया अतिशय सुलभ असल्याने सर्व युजर्स याचा सहजपणे वापर करण्यास सक्षम असल्याचे केव्हीन भारती मित्तल यांनी नमूद केले आहे. बीटा अवस्थेत एक दशलक्षपेक्षा जास्त हाईकमोजी तयार करण्यात आल्या असून हे फिचर सर्व युजर्सच्या पसंतीस उतरणार असल्याचा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला आहे. युजर आपला हा डिजीटल अवतार हाईकसह अन्य मॅसेंजरवर वापरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here