नोकिया २२० फोर-जी व नोकिया १०५ फिचर फोन्सचे अनावरण

0

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया २२० फोर-जी आणि नोकिया १०५ (२०१९) हे फिचर फोन्स बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले.

जगभरात सध्या स्मार्टफोन्सची लोकप्रियता अफाट असली तरी फिचरफोनदेखील मोठ्या प्रमाणात विकले जातात. या पार्श्‍वभूमिवर, नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने दोन फिचरफोन बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने नोकिया २२० फोर-जी व नोकिया १०५ (२०१९) या मॉडेल्सचे अनावरण करण्यात आले. यातील नोकिया २२० फोर-जी या मॉडेलमध्ये इंटरनेट वापराची प्राथमिक सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. तर नोकिया १०५ (२०१९) मध्ये मात्र ही सुविधा दिलेली नाही. हे दोन्ही स्मार्टफोन्स अनुक्रमे ३,००० आणि १,००० रूपये मूल्यात बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येतील.

नोकिया २२० फोर-जी या मॉडेलमध्ये पॉलीकार्बोनेट बॉडी प्रदान करण्यात आलेली आहे. यात २.४ इंच आकारमानाचा क्यूक्यूव्हिजीए क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम १६ एमबी तर इनबिल्ट स्टोअरेज २४ एमबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशयुक्त व्हिजीए क्षमतेचा कॅमेरा दिलेला आहे. यात म्युझिक प्लेअर आणि एफएम रेडिओ हे इनबिल्ट अवस्थेत दिले आहेत. यातील १,२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी सुमारे ६.३ तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच यामध्ये स्नेक, निंजा अप, स्काय गिफ्ट आदी गेम्सदेखील प्रिलोडेड अवस्थेत दिलेले आहेत. नावातच नमूद असल्यानुसार यात फोर-जी नेटवर्कचा सपोर्ट दिलेला आहे.

तर नोकिया १०५ (२०१९) या मॉडेलमध्ये तुलनेत प्राथमिक स्वरूपाचे फिचर्स आहेत. यातील डिस्प्ले १.७ इंच आकारमानाचा आहे. तर यातील बॅटरी ही ८०० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे १४.४ तासांचा बॅकअप देणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. यातदेखील एफएम रेडिओ तसेच टॉर्च दिलेली आहे. याची रॅम ४ एमबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ४ एमबी आहे. यात सुमारे ५०० एसएमएस आणि दोन हजार कॉन्टॅक्ट सेव्ह करता येणार आहेत. तथापि, यात कॅमेरा दिलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here