होंडा कंपनीने आपल्या बीआर-व्ही या मॉडेलच्या नवीन आवृत्तीचे अनावरण केले असून यात काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
होंडा कंपनीने २०१५ साली बीआर-व्ही हे मॉडेल लाँच केले होते. तर २०१६ मध्ये ही कार भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आली असून याला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. यानंतर या मॉडेलची नवीन आवृत्ती येणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. यावर शिक्कामोर्तब झाले असून इंडोनेशियातील इंटरनॅशनल मोटार शो मध्ये होंडा कंपनीने या मॉडेलची अद्ययावत आवृत्ती सादर केली आहे. यात मूळ आवृत्तीपेक्षा काही नवीन फिचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने नवीन बंपर देण्यात आलेले आहे. यामध्ये नवीन फॉग लॅप्सही प्रदान करण्यात आलेले आहेत. यात डे टाईम रनींग लँप्स दिलेले असून हेडलाईटमध्येही बदल करण्यात आला आहे. यात १६ इंच आकारमानाचे डायमंड कट या प्रकारातील अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. याच्या मागील बाजूच्या डिझाईनमध्ये बदल केला नसला तरी टेल लँप्स काही प्रमाणात बदलण्यात आलेले आहेत.
आतील भागाचा विचार केला असता, होंडा बीआर-व्ही मॉडेलमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली दिली असून यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले प्रणालींचा सपोर्ट दिलेला आहे. इंडोनेशियात हे मॉडेल पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. तथापि, भारतात पहिल्यांदा याची डिझेल आवृत्ती लाँच करण्यात येईल अशी शक्यता आहे. हे इंजिन बीएस-६ या मानकावर आधारित असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.