चार कॅमेर्‍यांनी युक्त ऑनर २० व ऑनर २० प्रो सादर

0

पंच होल डिस्प्लेसह तब्बल चार रिअर कॅमेर्‍यांनी युक्त असणारे ऑनर २० आणि ऑनर २० प्रो हे मॉडेल बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहे.

बहुतांश फिचर्स समान

सध्या बहुतेक स्मार्टफोन्समध्ये ड्युअल तर काही मॉडेल्समध्ये ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात येत आहे. तथापि, हुआवेच्या मालकीचा ब्रँड असणार्‍या ऑनरने आता तब्बल फोर रिअर कॅमेरा सेटअप असणारे दोन मॉडेल्स बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून एका शानदार कार्यक्रमात याचे अनावरण करण्यात आले आहे. या दोन्ही मॉडेल्समधील बहुतेक फिचर्स हे समान असून प्रो या मॉडेलमध्ये वाढीव रॅम व स्टोअरेज तसेच कॅमेर्‍यांमध्ये थोडे जास्त फिचर्स दिलेले आहेत.

ऑनर २०

ऑनर २० या मॉडेलच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा हा सोनी आयएमएक्स ५८६ सेन्सर असून याची क्षमता तब्बल ४० मेगापिक्सल्सची आहे. यात एफ १.८ अपर्चर देण्यात आलेले आहे. याच्या जोडीला अल्ट्रा वाईड अँगल लेन्सने युक्त असणारा १६ मेगापिक्सल्सचा; डेप्थ इफेक्टसाठी २ मेगापिक्सल्सचा तर मॅक्रो लेन्सयुक्त २ मेगापिक्सल्सच्या अन्य तीन कॅमेरे देण्यात आलेले आहेत. या चारही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा तसेच व्हिडीओ घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यातील पंच होल डिस्प्लेवर एफ/२.० अपर्चरसह ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, ऑनर २० या मॉडेलमध्ये ६.२६ इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस क्षमतेचा व पंच होल कॅमेर्‍याने युक्त असणारा डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये ऑक्टा-कोअर हायसिलीकॉन किरीन ९८० हा वेगवान प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ६ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी आहे. सुपर चार्ज सपोर्टने युक्त असणारी यातील बॅटरी ३,७५० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हे मॉडेल अँड्रॉइड ९.० पाय या आवृत्तीवर चालणारे असून यावर मॅजिक युआय २.१ हा युजर इंटरफेस दिलेला आहे.

ऑनर २० प्रो

ऑनर २० प्रो या मॉडेलमधील बहुतांश फिचर्स समान आहेत. मात्र याची रॅम ८ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज २५६ जीबी असणार आहे. यातही मागील बाजूस क्वॉड-कॅमेरा सेटअप असला तरी याची क्वालिटी अधिक उत्तम आहे. यात एफ/१.४ अपर्चरसह ४८ मेगापिक्सल्सचे सोनी आयएमएक्स ५८६ सेन्सर दिलेले आहे. याच्या जोडीला एफ/२.४ अपर्चरसह ८ मेगापिक्सल्सचा टेलीफोटो लेन्स, ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन व ३ एक्स ऑप्टीकल झुमयुक्त कॅमेरा दिला आहे. तसेच अल्ट्रा वाईड अँगल लेन्सने युक्त असणारा १६ मेगापिक्सल्सचा तर २ मेगापिक्सल्सचा मॅक्र्रो सेन्सरयुक्त कॅमेरादेखील प्रदान करण्यात आला आहे. यातील फ्रंट कॅमेरा, बॅटरीसह अन्य फिचर्स हे ऑनर २० या मॉडेलनुसारच असतील.

ऑनर २० आणि ऑनर २० प्रो या दोन्ही मॉडेल्समध्ये इन-डिस्प्ले नव्हे तर मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेले आहे. हे दोन्ही मॉडेल्स ११ जून रोजी भारतात लाँच करण्यात येणार असून ते फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here