ऑनर २० मालिका भारतात लाँच

0

ऑनरने भारतीय ग्राहकांसाठी २० या मालिकेतील तीन स्मार्टफोन्स सादर केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

हुआवेच्या मालकीचा ब्रँड असणार्‍या ऑनरने मे महिन्याच्या अखेरीस ऑनर २० आणि ऑनर २० प्रो या मॉडेल्सचे अनावरण केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन आज भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहेत. याच्या जोडीला ऑनर २० आय हे मॉडेलदेखील लाँच करण्यात आले आहे. यातील ऑनर २० आय हे मॉडेल १४,९९९ रूपये मुल्यात सादर करण्यात आले आहे. ऑनर २० या मॉडेलचे ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेजच्या मॉडेलचे मूल्य ३२,९९९ रूपये आहे. तर ऑनर २० प्रो या मॉडेलचे ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरजेचे मूल्य ३९,९९९ रूपये असणार आहे. हे सर्व मॉडेल्स फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आले आहेत.

ऑनर २०

ऑनर २० या मॉडेलच्या मागील बाजूस चार कॅमेर्यांचा सेटअप दिलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा हा सोनी आयएमएक्स ५८६ सेन्सर असून याची क्षमता तब्बल ४० मेगापिक्सल्सची आहे. यात एफ १.८ अपर्चर देण्यात आलेले आहे. याच्या जोडीला अल्ट्रा वाईड अँगल लेन्सने युक्त असणारा १६ मेगापिक्सल्सचा; डेप्थ इफेक्टसाठी २ मेगापिक्सल्सचा तर मॅक्रो लेन्सयुक्त २ मेगापिक्सल्सच्या अन्य तीन कॅमेरे देण्यात आलेले आहेत. या चारही कॅमेर्यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा तसेच व्हिडीओ घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यातील पंच होल डिस्प्लेवर एफ/२.० अपर्चरसह ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, ऑनर २० या मॉडेलमध्ये ६.२६ इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस क्षमतेचा व पंच होल कॅमेर्याने युक्त असणारा डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये ऑक्टा-कोअर हायसिलीकॉन किरीन ९८० हा वेगवान प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ६ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी आहे. सुपर चार्ज सपोर्टने युक्त असणारी यातील बॅटरी ३,७५० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हे मॉडेल अँड्रॉइड ९.० पाय या आवृत्तीवर चालणारे असून यावर मॅजिक युआय २.१ हा युजर इंटरफेस दिलेला आहे.

ऑनर २० प्रो

ऑनर २० प्रो या मॉडेलमधील बहुतांश फिचर्स समान आहेत. मात्र याची रॅम ८ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज २५६ जीबी असणार आहे. यातही मागील बाजूस क्वॉड-कॅमेरा सेटअप असला तरी याची क्वालिटी अधिक उत्तम आहे. यात एफ/१.४ अपर्चरसह ४८ मेगापिक्सल्सचे सोनी आयएमएक्स ५८६ सेन्सर दिलेले आहे. याच्या जोडीला एफ/२.४ अपर्चरसह ८ मेगापिक्सल्सचा टेलीफोटो लेन्स, ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन व ३ एक्स ऑप्टीकल झुमयुक्त कॅमेरा दिला आहे. तसेच अल्ट्रा वाईड अँगल लेन्सने युक्त असणारा १६ मेगापिक्सल्सचा तर २ मेगापिक्सल्सचा मॅक्र्रो सेन्सरयुक्त कॅमेरादेखील प्रदान करण्यात आला आहे. यातील फ्रंट कॅमेरा, बॅटरीसह अन्य फिचर्स हे ऑनर २० या मॉडेलनुसारच असतील. ऑनर २० आणि ऑनर २० प्रो या दोन्ही मॉडेल्समध्ये इन-डिस्प्ले नव्हे तर मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलेले आहे.

ऑनर २० आय

या मालिकेतील हा थोडा कमी फिचर्स असणारे मॉडेल आहे. यात ६.२१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२३४० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात ऑक्टा कोअर किरीन ७१० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यामध्ये २४, ८ आणि २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर याच्या पुढील बाजूस ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर यातील बॅटरी ३४०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here