स्वत:चा फेसबुक ‘अवतार’ कसा तयार कराल ? : स्टेप बाय स्टेप गाईड

0

भारतीय फेसबुक युजर्ससाठी आता ‘अवतार’ हे अतिशय आकर्षक फिचर सादर करण्यात आले असून याला अल्पावधीतच लोकप्रियता लाभली आहे. कुणीही अगदी सहजपणे स्वत:चा डिजीटल अवतार तयार करू शकतो. याबाबतची ही सहजसोप्या भाषेतील ‘स्टेप बाय स्टेप’ माहिती.

फेसबुकने गत महिन्यात भारतीय युजर्सला ‘डिजीटल अवतार’ तयार करण्याची सुविधा मिळणार असल्याचे सुतोवाच केले होते. यानुसार आता हे फिचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. डिजीटल अवतार म्हणजे कार्टून कॅरेक्टर होय. अ‍ॅपलच्या मेमोजीप्रमाणे याचा वापर करता येणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे युजर आपल्याला हव्या त्या पध्दतीत अर्थात कस्टमाईज्ड या प्रकारात याची निर्मिती व वापर करू शकेल. या फिचरचा वापर करण्याआधी आपल्याला काही बाबी लक्षात घ्याव्या लागणार आहेत.

* सध्या तरी डिजीटल अवतार तयार करण्याची सुविधा ही फक्त अँड्रॉइड व आयओएस युजर्ससाठी देण्यात आलेली आहे. म्हणजे कुणही फक्त स्मार्टफोनवरूनच अवतार तयार करू शकतो.

* युजरने तयार केलेला अवतार हा कॉमेंट, स्टोरी, प्रोफाईल इमेज आदींच्या माध्यमातून वापरता येणार आहे. तसेच इन्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट आदी त्रयस्थ अ‍ॅपमध्ये स्टीकर म्हणून देखील याचा वापर करता येईल.

स्वत: तयार करा अवतार !

१) स्मार्टफोनवरील फेसबुक अ‍ॅपच्या तीन रेषांनी दर्शविण्यात आलेल्या ‘हँबर्गर’ या आयकॉनवर क्लिक करा. अँड्रॉइड युजर्ससाठी हा विभाग वरील उजव्या बाजूस तर आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी खालील उजव्या बाजूस क्लिक करावे.

२) येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला फ्रेंडस, ग्रुप, मार्केटप्लेस, इव्हेंटस आदी विभाग दिसतील. याच्या खाली गेल्यानंतर आपल्याला ‘सी मोअर’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या विस्तारीत भागात पहिलाच पर्याय हा अवतार असून यावर आपल्याला टिचकी मारावी लागणार आहे.

३) अवतार विभागात ‘नेक्स्ट’ या पर्यायावर टिचकी मारल्यानंतर आपल्याला पहिल्या टप्प्यात ‘स्कीन टोन’ निवडावा लागणार आहे. यात युजर मूळ चेहर्‍याला आवश्यक असणारा हवा तो वर्ण निवडू शकतो. यात सध्या तरी एकूण २७ वर्णांचा पर्याय दिलेला आहे. यातून एक निवडून ‘नेक्स्ट’ वर टिचकी मारा.

४) यानंतर मूळ चेहरा हा स्मार्टफोनच्या वरील अर्ध्या भागात दिसत असून खालील भागात कस्टमायझेशनचे विविध पर्याय आपल्याला वापरता येतील. यातील पहिला पर्याय हा हेअरस्टाईलचा आहे. यात अगदी बारीक केसांपासून ते लांबलचक केसांच्या पर्यायातून आपल्याला रूचणारी केशभूषा निवडता येईल. यात आपण निवडलेली हेयर स्टाईल ही आपल्या चेहर्‍यावर नेमकी कशी दिसते हे वरील अर्ध्या भागात पाहता येईल. केश रचना निवडल्यानंतर पुढील पर्यायात केसांचा रंग निवडता येणार आहे.

५) यानंतर ‘फेस शेप’ या विभागात युजरला आपल्याला हवी असणारी चेहरेपट्टी निवडावी लागणार आहे. येथे फेस शेप, फेसलाईन व कॉम्प्लेक्शन आदींच्या माध्यमातून युजरला कस्टमायझेशनची सुविधा दिलेली आहे.

६) यानंतर अजून एक महत्वाचा भाग म्हणजे डोळ्याच्या आकारांचे सिलेक्शन होय. या भागात युजर आपल्या अवतारसाठी हव्या त्या आकाराचे व रंगाचे डोळे निवडू शकतो. यानंतर हव्या त्या आकाराच्या भुवया देखील लावण्याची सुविधा दिलेली आहे. यानंतर युजरला हवे असेल तर विविध आकारांच्या चष्म्यांमधून हवा तो चष्मा देखील चेहर्‍यावर लावता येणार आहे. हा चष्मा देखील हव्या त्या रंगाचा वापरता येणार आहे.

७) यानंतर चेहर्‍यातील अन्य अवयवांचे ‘कस्टमायझेशन’ करता येणार आहे. यात प्रामुख्याने हव्या त्या आकाराचे व रंगाचे नाक, हनुवटी, ओठ आदींचे सिलेक्शन करता येईल. याच्या पुढे गेल्यानंतर युजरला हवे असेल तर दाढी/मिशा लावण्याची सुविधा दिलेली आहे.

८) यानंतर महत्वाचा भाग म्हणजे ‘बॉडी शेप’ची निवड होय. या भागात त्याला हवी असणारी शरीरयष्टी निवडू शकतो.

९) यानंतर अंगावरील कपड्यांची निवड करण्याची सुविधा यामध्ये दिलेली आहे. यात युजर त्याला हव्या असणार्‍या कपड्यांची निवड करू शकतो. यात हवा तसा रंग देखील बदलता येणार आहे. तर पुढील भागात ‘हेडवेअर’ म्हणजे टोपी वा फेटा आदींचे पर्याय निवडू शकतो.

…झाला आपला अवतार तयार !

यानंतर एकदा का आपला ‘डिजीटल अवतार’ तयार झाला की, आपल्या टाईमलाईनवर पोस्टच्या माध्यमातून याची माहिती अन्य युजर्सला देता येणार आहे. तर, एकदा अवतार तयार झाला की याच अवताराचे डिजीटल स्टीकर्स तयार होणार असून ते संबंधीत युजर कॉमेंटच्या स्वरूपात वापरू शकणार आहे.

खालील व्हिडीओत फेसबुक अ‍ॅपवर ‘अवतार’ कसा तयार करावा हे दर्शविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here