अशी वापरा फेसबुकची नवीन प्रायव्हसी सेटींग

0

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी नवीन प्रायव्हसी सेटींग प्रदान केली असून या माध्यमातून वापरकर्त्यांना सुरक्षेचा एक नवीन आयाम सादर केला आहे. येथे ही नवीन सुविधा नेमकी कशी वापरावी याची माहिती दिलेली आहे.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे नेहमी माहितीची गोपनीयता आणि सुरक्षेबाबत भाष्य करत असतात. युजर्स हा सुरक्षितपणे आपल्या विविध मंचांवरून सोशल नेटवर्कींगचा आनंद घेऊ शकला पाहिजे असे त्यांचे मत आहे. यामुळे फेसबुकवर आधीच प्रायव्हसी सेटींग दिली असून याच्या माध्यमातून युजर त्याला हव्या त्या पध्दतीत आपल्या माहितीचे संरक्षण करू शकतो. आता हे सुरक्षा कवच अधिक मजबूत करण्यात आले असून यासाठी ‘ऑफ-फेसबुक अ‍ॅक्टीव्हिटी’ हे नवीन फिचर देण्यात आले आहे. याबाबत फेसबुकने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे.

या वृत्तानुसार आता कोणताही युजर फेसबुकवर मुशाफिरी करत असतांना शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि यावरील एंगेजमेंट ही कुणी पहावी ? आपल्या पोस्ट कुणी पहाव्यात ? यावर कॉमेंट कोण करू शकेल ? आदींसह अनेक बाबींची सेटींग सहजपणे करू शकेल. फेसबुकचा युजर हा कोणतेही अ‍ॅप अथवा अन्य वेबसाईटला व्हिजीट देत असतांना याची माहिती फेसबुकला विविध बिझनेस टुल्सच्या मदतीने मिळत असते. याच माहितीच्या आधारे युजरला त्याच्या टाईमलाईनवर जाहिराती तसेच त्याच्या आवडी-निवडींशी संबंधीत कंटेंट पहायला मिळत असते. या नवीन टुलच्या मदतीने युजर यापैकी कोणती माहिती द्यावी याचे सिलेक्शन करू शकतो. अर्थात, टुलचा वापर हा युजरसाठी अधिक पारदर्शकता आणि सुरक्षेसाठी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फेसबुकच्या या नवीन सेटींगचा वापर कसा करावा याची माहिती खाली दिलेली आहे.

१) फेसबुकच्या सेटींगमध्ये जाऊन युवर फेसबुक इन्फॉर्मेशन सिलेक्ट करा.

२) यानंतर मेन्यूवर क्लिक करून ‘ऑफ फेसबुक अ‍ॅक्टीव्हिटी’ या पर्यायावर क्लिक करा.

३) येथे आपल्याला फेसबुक आपली माहिती बाहेरून कशा प्रकारे जमा करतो याची माहिती मिळेल. यात आपल्याला नको असलेले पर्याय बंद करता येतील.

४) यानंतर एका बॅनरच्या माध्यमातून युजर वापरत असलेल्या अ‍ॅपबाबतची फेसबुकला कळलेली माहिती समोर येईल.

५) यानंतर युजर वापरत असणारे अ‍ॅप हे फेसबुकला नेमकी कोणती माहिती शेअर करतात याची माहिती युजरला कळेल.

६) युजर फेसबुककडे शेअर करत असलेली माहिती मॅनेज युवर ऑफ-फेसबुक अ‍ॅक्टीव्हिटी वर क्लिक करून टर्न-ऑफ करू शकतो.

७ ) यातील ट्रॅकर बंद केल्यानंतर फेसबुककडे जमा होणारी युजरची माहिती बंद होईल. तथापि, थर्ड पार्टी अ‍ॅप्सकडून फेसबुकला मिळणारी माहिती यामुळे बंद होणार नसल्याचे लक्षात ठेवण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here