एचटीसीचे भारतात पुनरागमन : वाईल्डफायर एक्स स्मार्टफोन सादर

0

एचटीसी कंपनीने वाईल्डफायर एक्स या स्मार्टफोनच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत पुनरागमन केले असून या मॉडेलमध्ये अनेक सरस फिचर्स आहेत.

एचटीसी ही मूळची तैवान येथील कंपनी कधी काळी स्मार्टफोनच्या उत्पादनात अग्रेसर होती. विशेष करून प्रिमीयम म्हणजे उच्च श्रेणीतील मॉडेल्ससाठी एचटीसीची ख्याती होती. भारतातही या कंपनीचे विविध मॉडेल्स लोकप्रिय झाले होते. तथापि, मध्यंतरी शाओमी व विवोसह अनेक चीनी कंपन्यांनी स्मार्टफोनच्या बाजारपेठेत अतिशय आक्रमकपणे पदार्पण केले. अत्यंत किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्स देण्याचा सपाटाच या कंपन्यांनी लावला. यामुळे एचटीसीला मोठ्या प्रमाणात धक्का बसला. परिणामी गत वर्षाच्या मध्यावर एचटीसीने भारतातील स्मार्टफोनची विक्री बंद करण्याचे जाहीर केले होते. आता मात्र जवळपास वर्षभरानंतर ही कंपनी भारतीय बाजारपेठेत पुन्हा परतली असून त्यांनी वाईल्डफायर एक्स हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला आहे. हे मॉडेल ४ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज आणि ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे १२,९९९ आणि ९,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. यांना २२ ऑगस्टपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात येणार आहे.

एचटीसी वाईल्डफायर एक्स या मॉडेलमध्ये ६.२२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले दिलेला असून यामध्ये वॉटरड्रॉप या प्रकारातील नॉच प्रदान करण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा हेलीओ पी २२ हा प्रोसेसर आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असून याच्या अंतर्गत तीन कॅमेरे आहेत. यातील मुख्य कॅमेरा १२ मेगापिक्सल्सचा असून याला ८ एक्स हायब्रीड झूमयुक्त ८ मेगापिक्सल्सचा दुसरा तर डेप्थ सेन्सरने युक्त ५ मेगापिक्सल्सच्या तिसर्‍या कॅमेर्‍याची जोड देण्यात आलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे. फास्ट चार्जींग सपोर्टने युक्त असणारी यातील बॅटरी ३३३० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा आहे. या स्मार्टफोनमध्ये मायबडी या नावाचे सुरक्षाविषयक टुल दिलेले आहे. यात आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या आवाजातील अलार्मसह लाईव्ह लोकेशन शेअरिंग आणि भोवतालचा आवाज तात्काळ रेकॉर्ड करण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे.

दरम्यान, एचटीसी कंपनी लवकरच दोन अन्य स्मार्टफोनदेखील भारतीय ग्राहकांसाठी सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. साधारणपणे दिवाळीआधी हे मॉडेल्स लाँच होऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here