हुंंदाईने आपल्या ग्रँड आय १० या मॉडेलची सीएनजी आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली असून मॅग्ना या व्हेरियंटसाठी हा पर्याय देण्यात आलेला आहे.
ग्रँड आय १० हे हुंदाईचे अतिशय लोकप्रिय मॉडेल असून याला विविध व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. खरं तर, यासाठी सीएनजीचा पर्याय आधीच उपलब्ध असला तरी सर्वसामान्य ग्राहकांना याला खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले नव्हते. एकाच वेळी शेकडोंनी खरेदी करणार्या विविध टुर्स कंपन्यांसाठीच हा पर्याय उपलब्ध होता. आता मात्र ही आवृत्ती सर्वांसाठी सादर करण्यात आली आहे. याचे दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य ६.३९ लाख रूपये आहे. वर नमूद केलेल्या मॅग्ना व्हेरियंटच्या पेट्रोल आवृत्तीपेक्षा याचे मूल्य ६७ हजार रूपयांनी जास्त आहे. यात हुंदाई आय १० च्या स्पोर्टझ् आणि अॅस्ट्रा या उच्च श्रेणीतील मॉडेल्समधील फिचर्स दिलेले नाहीत. तथापि, यामध्ये पॉवर विंडो, ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटीयुक्त ऑडिओ सिस्टीम, रिमोट लॉकींग, एसी व्हेंटस्, इलेक्ट्रॉनिक पध्दतीत अॅडजस्ट होणारे मिरर्स, स्टीअरिंग माऊंटेड कंट्रोल्स, ड्युअल फ्रंट एयरबॅग्ज, एबीएस विथ इबीडी आदी फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.
हुंदाईच्या ग्रँड आय १० सीएनजी आवृत्तीमध्ये १.२ लीटर क्षमतेचे फोर-सिलींडर इंजिन देण्यात आले असून याला ५-स्पीड मॅन्युअल गिअर्स संलग्न करण्यात आले आहेत.