देशात चीनविरोधी भावना प्रबळ होत असतांना मायक्रोमॅक्ससह अन्य स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी पुनरागमनाची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्मित झाले असल्याने चीनी उत्पादनांविरूध्द जनआक्रोश उफाळून आला आहे. ठिकठिकाणी चीनी उत्पादनांवर बंदी आणण्याची मागणी होत असून या देशातील कंपन्यांचे स्मार्टफोन्ससह विविध उपकरणे आणि ऑनलाईन सेवा वापरू नये असे आवाहन सोशल मीडियातून केले जात आहे. याचा चीनी उपकरणांच्या व त्यातही स्मार्टफोनच्या उत्पादकांना मोठा फटका पडल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमिवर चीनी कंपन्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची भारतीय कंपन्यांना संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. यात मायक्रोमॅक्स, लाव्हा, कार्बन आदी भारतीय कंपन्या लवकरच या क्षेत्रात पुनरागमन करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मायक्रोमॅक्सने ट्विटरवरील विविध युजर्सच्या प्रश्नांना उत्तरे देतांना आपली कंपनी लवकरच स्मार्टफोन्सचे नवीन मॉडेल लाँच करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कार्बन आणि लाव्हा कंपन्यांनीही याची घोषणा केली आहे.
कधी काळी मायक्रोमॅक्स, लाव्हा आणि कार्बन या भारतीय कंपन्या किफायतशीर मूल्य असणार्या मॉडेल्समुळे लोकप्रिय झाल्या होत्या. नंतर मात्र शाओमी, ओप्पो आदींसारख्या चीनी कंपन्यांच्या आक्रमणामुळे या तिन्ही कंपन्यांना स्मार्टफोनच्या क्षेत्रातून अक्षरश: गाशा गुंडाळावा लागला होता. सध्या या तिन्ही कंपन्या फक्त फिचर फोन्सचे उत्पादन करत आहेत. तथापि, आता चीनी कंपन्यांच्या प्रॉडक्टवर बंदीची भावना प्रबळ होत असल्याने त्यांनी स्मार्टफोन उत्पादनाची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. चीन विरोधी भावनेचा त्यांना कितपत लाभ होणार हे आजच सांगता येणार नसले तरी त्यांच्या पुनरागमनाकडे सर्व जण उत्सुकतेने पाहत असल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत भारतात विकल्या गेलेल्या स्मार्टफोन्समध्ये चीनी कंपन्यांचा तब्बल ८१ टक्के इतका वाटा होता. तर भारतीय कंपन्यांचे फक्त १ टक्के मॉडेल्स विकले गेले होते. देशातील टॉपच्या १० स्मार्टफोन उत्पादकांमध्ये तब्बल आठ कंपन्या चीनी आहेत. या पार्श्वभूमिवर, भारतीय कंपन्या स्मार्टफोनच्या क्षेत्रातील चीनी वर्चस्वाला कशी मात देता याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
I Hope Kahitari Navin Milel