टिकटॉक विरोधात सोशल मीडियात उद्रेक झाला असून अनेक युजर्सनी या अॅपला फक्त एक रेटींग दिले असल्याने याची रेटींग घसरल्याचे दिसून आले आहे.
टिकटॉकने भारतीयांना भुरळ घातल्याचे नव्याने सांगण्याची गरज नाही. या अॅपने काही दिवसांपूर्वीच दोन अब्ज म्हणजे २०० कोटी युजर्सचा टप्पा पार केला. यात चीन वगळता सर्वाधीक म्हणजेच तब्बल ६० कोटी युजर्स हे भारतातील आहेत. भारतात अजूनही वेगाने टिकटॉकची लोकप्रियता वाढत आहे. तथापि, आता हे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरं तर हे अॅप आधीपासूनच वादात सापडलेले आहे. या अॅपवर युजर्सची गोपनीय माहिती चोरण्याचा आरोप लागलेला आहे. तर गेल्या वर्षी यावर आक्षेपार्ह कंटेंट आढळून आल्याने भारतासह काही देशांमध्ये यावर बंदी घालण्यात आली होती. भारतात काही दिवसांमध्येच बंदी उठविण्यात आल्यानंतर टिकटॉक सुसाट गतीने लोकप्रिय झाले. तथापि, आता पुन्हा एकदा टिकटॉक विरोधात जनमानस क्षुब्ध झाल्याचे दिसून येत आहे.
कॅरी मिनाती या लोकप्रिय युट्युबरने अलीकडेच एक व्हिडीओ प्रसारित केला होता. ”युट्युब व्हर्सेस टिकटॉक : द एंड” या नावाचा हा व्हिडीओ युट्युबने डिलीट करून टाकल्याने वादंग निर्माण झाले होते. यामुळे टिकटॉक व युटयुबच्या युजर्समध्ये सायबर युध्द सुरू झाले. यात कॅरी मिनातीच्या चाहत्यांनी #bantiktok हा हॅशटॅग ट्रेंडींगला आणला. यानंतर फैजल सिद्दीकी या टिकटॉकवर तुफान लोकप्रिय असणार्या युजरने तरूणींवरील अॅसिड अटॅकचे समर्थन करणारा व्हिडीओ टाकल्याने खळबळ उडाली. टिकटॉकने हा व्हिडीओ डिलीट करून फैजल सिद्दीकीचे अकाऊंट बंद करून टाकले तरी युजर्स शांत झाले नाही. यानंतर लागलीच सायबर विश्वात टिकटॉक विरूध्द वातावरण निर्माण झाले असून यातूनच आता या अॅपला फक्त १ रेटींग देण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.
टिकटॉक आधी देखील अनेकदा वादात सापडले असले तरी त्याची आजवरची गुगल प्ले स्टोअरवरील रेटींग ४.५ इतकी होती. मात्र काही दिवसांमध्ये लक्षावधी युजर्सनी फक्त १ रेटींग दिल्याने यात घसरण झाली आहे. सध्या गुगल प्ले स्टोअरवर टिकटॉकची रेटींग १.३ इतकी दिसत आहे. टिकटॉकला पुअर रेटींग देण्याची मोहिम सोशल मीडियात सुरू झाली असून यामुळे या अॅपला नवीन युजर्स मिळवण्यात अडचण येईल असे मानले जात आहे. विशेष करून, बरेच युजर्स हे रेटींग पाहूनच अॅप इन्स्टॉल करत असतात. यामुळे टिकटॉकच्या लोकप्रियतेत घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दरम्यान, अॅपलच्या अॅप स्टोअरवर अजूनही टिकटॉकची रँकींग ही ४.६ इतकी दिसत आहे. भारतात आयओएस प्रणालीचे युजर्स तुलनेत कमी असल्याने अॅप स्टोअरवर टिकटॉकची पत टिकून राहिली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात, गुगल प्ले स्टोअरवरील युजर्सचा उद्रेक पाहून टिकटॉकची मूळ कंपनी असणार्या बाईट डान्सचे चांगलेच धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.