ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांसह मिळणार इन्फीनिक्सचा ‘हा’ स्मार्टफोन

0

इन्फीनिक्स कंपनीने हॉट ७ प्रो हा स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला असून यात ड्युअल फ्रंट कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत.

ट्रान्ससिऑन होल्डींगच्या मालकीचा ब्रँड असणार्‍या इन्फीनिक्सने अलीकडे भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने इन्फीनिक्स हॉट ७ प्रो हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. गत वर्षी सादर करण्यात आलेल्या हॉट ६ प्रो या मॉडेलची ही नवीन आवृत्ती असल्याचे मानले जात आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात ड्युअल फ्रंट कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. हे कॅमेरे अनुक्रमे १२ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे असून यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार अशा सेल्फी प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. दरम्यान, या स्मार्टफोनच्या मागील बाजूसदेखील याच क्षमतांचे दोन कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. अर्थात, या स्मार्टफोनमध्ये एकूण चार कॅमेरे आहेत.

इन्फीनिक्स हॉट ७ प्रो या मॉडेलमध्ये ६.१९ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला असून याच्या वरील भागात नॉच दिलेला आहे. यात मिडियाटेकचा हेलीओ पी २२ हा प्रोसेसर आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविता येणार आहे. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर एक्सओएस ५.० हा युजर इंटरफेस दिलेला आहे. या स्मार्टफोनचे मूल्य ९,९९९ रूपये असून लाँचींग ऑफर म्हणून याला ८,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. हे मॉडेल फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here