इन्फीनिक्सने ट्रिपल रिअर कॅमेर्यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा एस ५ लाईट हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.
इन्फीनिक्स एस ५ लाईट या मॉडेलच्या मागील बाजूस तीन कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. यातील प्रमुख कॅमेरा एफ/२.० अपर्चरने युक्त असून याला दोन मेगापिक्सल्स आणि क्यूव्हिजीए क्षमतेच्या दोन कॅमेर्यांची जोड देण्यात आलेली आहे. यात फोर-इन-वन सुपर पिक्सेल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. याशिवाय, यात थ्रीडी फेस ब्युटी, एआर इमोजी, एआर स्टीकर्स, एआय सीन डिटेक्शन, हायब्रीड फोकस, बोके मोड आदी फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. या तिन्ही कॅमेर्यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा एक्सओएस ५.५ हा युजर इंटरफेस दिलेला आहे.
उर्वरित फिचर्सचा विचार केला असता इन्फीनिक्स एस५ लाईट या मॉडेलमध्ये ६.६ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा (१६०० बाय ७२० पिक्सल्स) इन्फीनिटी ओ पंच होल या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. या मॉडेलचे मूल्य ७,९९९ रूपये असून हे मॉडेल २२ नोव्हेंबरपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवर उपलब्ध होणार आहे.