इन्स्टाग्रामही टिकटॉकच्या मार्गावर; रील्स फिचर सादर

0
( छायाचित्र सौजन्य : टेकक्रंच )

इन्स्टाग्रामने टिकटॉक प्रमाणे १५ सेकंदाचा व्हिडीओ अतिशय मनोरंजक पध्दतीत तयार करून शेअर करण्यासाठी रील्स हे फिचर सादर केले आहे.

बाईट डान्स या चीनी कंपनीची मालकी असणार्‍या टिकटॉकने जगभरात अक्षरश: धमाल केली आहे. विशेष करून तरूणाईला या अ‍ॅपने वेड लावले आहे. यात १५ सेकंदाच्या व्हिडीओला विविध ऑडिओ, व्हिडीओ आणि अ‍ॅनिमेशनने सज्ज करून शेअर करता येते. टिकटॉकच्या यशाने प्रभावीत होऊन फेसबुकने लास्सो या नावाने याच प्रकारचे फिचर्स असणारे अ‍ॅप विकसित केले असून ते सध्या मर्यादीत प्रमाणात लाँच केले आहे. तर गुगलने याच प्रकारातील फायरवर्क या अ‍ॅपला खरेदी केले आहे. दरम्यान, हे सर्व सुरू असतांना फेसबुकची मालकी असणार्‍या इन्स्टाग्रामने आपल्या युजर्सला टिकटॉककडे जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्या अ‍ॅपचीच नक्कल केली आहे. खरं तर याबाबत गत महिन्यातच संकेत मिळाले होते. तेव्हा समोर आलेल्या माहितीनुसार इन्टाग्राम क्लीप या नावाने फिचर सादर करणार असल्याचे मानले जात होते. तथापि, इन्स्टाग्रामने क्लीप नव्हे तर रील्स नावाने हे फिचर सादर केले आहे. पहिल्यांदा ब्राझीलमध्ये याला लाँच करण्यात आले असून नंतर क्रमाक्रमाने याला जगातील अन्य देशांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली असून याबाबत टेक्रंच या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे.

इन्स्टाग्रामचे रील्स हे फिचर टिकटॉकप्रमाणे १५ सेकंदाचा व्हिडीओ हा ध्वनी आणि व्हिडीओच्या विविध इफेक्टसह शेअर करण्याची सुविधा देते. यात इन्स्टाग्रामवर खूप मोठी ऑडिओ लायब्ररी प्रदान करण्यात आलेली आहे. कुणीही युजर या प्रकारे तयार करण्यात आलेला हा १५ सेकंदाचा व्हिडीओ स्टोरीज म्हणून वापरू शकतो. इन्स्टाग्रामवर आधीच स्टोरीज हे फिचर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहे. यातच आता स्टोरीजला अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न रील्स या फिचरच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अर्थात, या माध्यमातून टिकटॉकला टक्कर देण्याचा प्रयत्नदेखील इन्स्टाग्रामतर्फे करण्यात येत असून याला कितपत यश मिळणार हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here