आता इन्स्टाग्राम करणार टिकटॉकची नक्कल; सादर करणार ‘हे’ फिचर !

0
इन्स्टाग्राम,इन्स्टाग्रामच्या,instagram

इन्स्टाग्राम लवकरच टिकटॉक या सध्या तुफान लोकप्रिय झालेल्या अ‍ॅपची नक्कल करणार असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत नवीन फिचरची चाचणी सुरू झाली आहे.

टिकटॉक या अ‍ॅपने जगभरातील तरूणाईला अक्षरश: वेड लावले आहे. बाईटडान्स या चीनी कंपनीची मालकी असणार्‍या या अ‍ॅपचे नुकतेच एक अब्ज डाऊनलोड पूर्ण झाले आहेत. या अ‍ॅपमध्ये कुणीही युजर शॉर्ट व्हिडीओ तयार करून याला शेअर करू शकतो. यात अतिशय मनोरंजक पध्दतीत स्वत:चे व्हिडीओ शेअर करता येत असल्याने याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अ‍ॅपने टिकटॉकच्या याच फिचरची नक्कल करण्याची तयारी केली असल्याची माहिती समोर आली आहे. हे अ‍ॅप लवकरच क्लिप हे फिचर सादर करणार असून यात टिकटॉकच्या व्हिडीओ प्रमाणेच गाण्यांना संलग्न करून व्हिडीओ शेअर करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या अ‍ॅपची चाचणी सुरू झाली असून लवकरच याला अधिकृतपणे उपलब्ध करण्यात येईल असे स्पष्ट झाले आहे.

इन्स्टाग्रामने आधी स्नॅपचॅट या अ‍ॅपच्या स्टोरीज या फिचरची नक्कल करून याच नावाने फिचर लाँच केले असून याला तुफान लोकप्रियता मिळाली आहे. यामुळे अर्थातच स्नॅपचॅटला जोरदार धक्का बसला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता टिकटॉकची कॉपी करून त्या अ‍ॅपला टक्कर देण्याचे इन्स्टाग्रामचे मनसुबे दिसून येत आहेत. यात ते यशस्वी होणार का ? याबाबत टेक विश्‍वात औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here