भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्याने अनेक जण हिरमुसले असले तरी आता त्यांच्यासाठी इन्स्टाग्रामने शॉर्ट व्हिडीओला मनोरंजक पध्दतीत सादर करण्याची सुविधा देणारे रील्स हे फिचर भारतीय युजर्ससाठी सादर केले आहे.
भारतात अलीकडेच तब्बल ५९ चीनी अॅप्सवर बंदी लादण्यात आली असून यात टिकटॉकचाही समावेश आहे. टिकटॉकला भारतात तुफान लोकप्रियता मिळाली होती. देशात या अॅपचे अंदाजे ६० कोटी युजर्स होते. टिकटॉकवरील बंदीचे बहुतांश युजर्सनी स्वागत केले असले तरी अनेक जण हिरमुसले देखील आहेत. त्यांच्या साठी दिलासा देणारी बातमी आहे. अगदी टिकटॉक प्रमाणेच १५ सेकंदाचा शॉर्ट व्हिडीओ अतिशय मनोरंजक पध्दतीत सादर करण्याची सुविधा देणारे रील्स हे फिचर आता भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस हे फिचर पहिल्यांदा ब्राझीलमध्ये सादर करण्यात आले होते. यानंतर जर्मनी, फ्रान्स आणि आता भारतात याला उपलब्ध करण्यात आले आहे. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर याला प्रयोगात्मक अवस्थेत सादर करण्यात आले होते. आता मात्र सर्व युजर्ससाठी हे उपलब्ध करण्यात आल्याची माहिती इन्स्टाग्रामतर्फे देण्यात आली आहे. भारतातील सर्व युजर्सला क्रमाक्रमाने हे फिचर देण्यात येत असून यासाठी आपल्या स्मार्टफोनमधील इन्स्टाग्रामच्या अॅपचे अपडेट असणे आवश्यक आहे.
इन्स्टाग्रामचे रील्स हे फिचर टिकटॉकप्रमाणे १५ सेकंदाचा व्हिडीओ हा ध्वनी आणि व्हिडीओच्या विविध इफेक्टसह शेअर करण्याची सुविधा देते. यात इन्स्टाग्रामवर खूप मोठी ऑडिओ लायब्ररी प्रदान करण्यात आलेली आहे. तसेच यात विविध व्हिडीओ इफेक्ट आणि एआर (ऑग्युमेंटेड रिअॅलिटी) फिल्टर्स देखील दिले असून याच्या मदतीने संबंधीत शॉर्ट व्हिडीओ हा अतिशय चित्ताकर्षक पध्दतीत तयार करून शेअर करता येईल.
कुणीही युजर या प्रकारे तयार करण्यात आलेला हा १५ सेकंदाचा व्हिडीओ स्टोरीज म्हणून वापरू शकतो. इन्स्टाग्रामवर आधीच स्टोरीज हे फिचर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहे. यातच आता या माध्यमातून टिकटॉकला टक्कर देण्याचा प्रयत्नदेखील इन्स्टाग्रामतर्फे करण्यात येत असून याला कितपत यश मिळणार हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
रील्सचा वापर करण्यासाठी इन्स्टाग्रामचा कॅमेरा ओपन करून खालील भागात दिसणार्या रील्स या नवीन पर्यायावर टिचकी मारावी लागणार आहे. नंतर येथून १५ सेकंदाचा व्हिडीओ तयार करता येईल. यात मल्टीपल व्हिडीओची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. या माध्यमातून तयार करण्यात आलेला व्हिडीओ युजर शेअर करू शकतो.
रील्स फिचरचा वापर कसा कराल ?
इन्स्टाग्रामवरील रील्स फिचरचा कुणीही सहजपणे वापर करू शकतो. यासाठी खालील स्टेप्स पूर्ण कराव्या लागणार आहेत.
१) इन्स्टाग्राम कॅमेर्याच्या खालील बाजूस असणार्या रील्स या पर्यायावर टिचकी मारा.
२) नंतर ऑडिओ या पर्यायाला निवडा. यात युजर म्युझिक लायब्ररीमध्ये उपलब्ध असणार्या गाण्यांमधून आपल्याला हवे ते गाणे सिलेक्ट करू शकतो. यात युजर स्वत:चा आवाज देखील रेकॉर्ड करून वापरू शकतो.
३) युजर या व्हिडीओला हवे ते एआर इफेक्ट वापरून याला आकर्षक स्वरूप देऊ शकतो.
४) युजरने तयार केलेला व्हिडीओ फास्ट अथवा स्लो-मोशन मध्ये करण्याची सुविधा देखील यात दिलेली आहे.
या सर्व स्टेप वापरून युजर रील्स या फिचरच्या मदतीने शॉर्ट व्हिडीओ तयार करून तो शेअर करू शकतो.