आयओएस १३ आवृत्तीची घोषणा : जाणून घ्या फिचर्स

0

अ‍ॅपलने आपल्या आयओएस १३ या नवीन आवृत्तीची घोषणा केली असून यात अनेक नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश आहे.

अ‍ॅपल कंपनीने आपल्या वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये अपेक्षेनुसार अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे आयओएस या ऑपरेटींग सिस्टीमची तेरावी आवृत्ती सादर करण्यात आली आहे. यात आयफोनला अधिक गतीमान आणि लवचीक बनविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आयफोन ६ एस आणि त्यापुढील आवृत्तीच्या मॉडेल्सला अपडेटच्या स्वरूपात ही प्रणाली लवकरच वापरण्यासाठी मिळणार असून यातील महत्वाचे फिचर्स हे खाली दिलेले आहेत.

* डार्क मोड : खरं तर आयओएस ७ या आवृत्तीपासूनच डार्क मोडची तयार करण्यात आली होती. मात्र आयओएस १३ या आवृत्तीच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने डार्क मोड प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे युजर डार्क थिमवर आधारीत वॉलपेपर्स, नोटिफिकेशन्स, विजेटस आदींना डार्क मोडमध्ये वापरू शकेल.

* किबोर्डवर स्वाईप करण्याची सुविधा : आयओएस प्रणालीत आधीच अनेक थर्ड पार्टी किबोर्ड वापरण्याची सुविधा दिलेली आहे. तथापि, त्यांच्यात असणारे किबोर्ड स्वाईप करण्याचे फिचर आयओएसच्या किबोर्डमध्ये आजवर नव्हते. याची उणीव ताज्या अपडेटमध्ये भरून काढण्यात आली आहे.

* मॅप्सचे अपडेट : आयओएसच्या ताज्या आवृत्तीत अ‍ॅपल मॅप्सला अद्ययावत करण्यात आले आहे. यात मॅप्सचा कायापालट करण्यात आला असून गुगलच्या स्ट्रीट व्ह्यू प्रमाणे एक नवीन मोड प्रदान करण्यात येणार आहे.

* प्रायव्हसी : आयओएस १३ या आवृत्तीत सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. यात एकाच वेळी एखाद्या अ‍ॅपला लोकेशन हिस्ट्रीसह अन्य गोपनीय माहिती ट्रॅक न करण्याची आज्ञावली देण्याची सुविधा दिली जाणार आहे. यामुळे युजरची गोपनीय माहिती सुरक्षित राहणार आहे. तर नव्या अपडेटमध्ये साईन-इन विथ अ‍ॅपल ही सुविधा डेव्हलपर्सला देण्यात येणार आहे. याचा थर्ड पार्टी अ‍ॅपच्या लॉगीनसाठी उपयोग केला जाणार आहे.

* रिमाईंडरचे अपडेट : आयओएस १३ या प्रणालीत रिमाइंडर अ‍ॅपला अद्ययावत करण्यात आले आहे. याचा युजर इंटरफेस बदलण्यात आला असून रिमाइंडरसाठी कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजे एआयचा उपयोग करण्यात आला आहे.

* नवीन फोटो/व्हिडीओ एडीटींग टुल : आयओएस १३ या प्रणालीत फोटो आणि व्हिडीओ एडीट करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यात प्रतिमा आणि व्हिडीओंना रोटेट करण्यासाठी विविध इफेक्ट देता येतील.

* एक्सटर्नल स्टोअरेज : आयओएस १३ या आवृत्तीत मायक्रो-एसडी कार्ड आणि युएसबी ड्राईव्हसारख्या एक्सटर्नल स्टोअरेजचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. या प्रकारच्या स्टोअरेजमधून फाईल्स अ‍ॅपमध्ये डाटा घेण्याची सुविधा आता मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here