मोठ्या रेटीना डिस्प्लेसह सरस फिचर्सने सज्ज आयपॅड ७ चे आगमन

0

अ‍ॅपलने आपल्या कार्यक्रमात आयपॅडच्या सातव्या पिढीतील आवृत्तीची घोषणा केली असून यात मोठ्या डिस्प्लेसह अनेक सरस फिचर्स आहेत.

अ‍ॅपलतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या लाँचींग कार्यक्रमात विविध उपकरणांची घोषणा होणार असल्याचे अपेक्षित होते. विशेष करून यातील आयफोनच्या नवीन आवृत्तीबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. यासोबत अन्य उपकरणेदेखील अपेक्षित होती. या अनुषंगाने या कार्यक्रमात आयपॅडच्या नवीन आवृत्तीची घोषणा केली. हा कंपनीचा सातव्या पिढीतील आयपॅड आहे. गेल्या वर्षी ९.७ इंच आकारमानाच्या डिस्प्लेयुक्त आयपॅडची घोषणा करून अ‍ॅपलने चाहत्यांना खूश केले होते. आता मोठा अर्थात १०.२ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हा रेटीना डिस्प्ले २१६० बाय १६२० पिक्सल्स क्षमतेचा आहे. याच्या खाली होम हे फिजीकल बटन दिले असून येथेच टच आयडी फिंगरप्रिंट सेन्सर प्रदान करण्यात आलेले आहे.

आयपॅडच्या सातव्या पिढीतील मॉडेलमध्ये ए१० फ्युजन हा प्रोसेसर दिलेला असून याच्या ३२ आणि १२८ जीबी स्टोअरेजच्या दोन आवृत्त्या आहेत. दोन्ही आवृत्यांमध्ये वायफाय आणि वायफाय+सेल्युलर असे पर्याय दिलेले आहेत. याच्या मागील बाजूस ८ तर समोर १.२ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे देण्यात आलेले आहेत. या मॉडेलवर पहिल्या पिढीतील अ‍ॅपल स्टायलस पेन्सीलदेखील काम करू शकणार आहे. याच्या मदतीने रेखाटन करता येणार असून नोटस् घेण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. तर याला संलग्न होण्याजोगा किबोर्डदेखील लाँच करण्यात आला आहे. याच्या मदतीने आयपॅडचा लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारात वापर करता येईल.

सातव्या पिढीतील आयपॅडचे मॉडेल हे या वर्षाच्या प्रारंभी सादर करण्यात आलेल्या आयपॅड ओएस या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे आहे. यात मॅक श्रेणीतील संगणकाप्रमाणेच मल्टी-टास्कींगची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय, यामध्ये एआर प्रणालीचा सपोर्ट आहे. यात नॅनो सीम वा ई-सीमकार्ड वापरता येणार आहे. भारतात आयपॅडची ही आवृत्ती पहिल्यांदा ३२ जीबी व्हेरियंटच्या स्वरूपात सादर करण्यात आलेली आहे. यात ३२ जीबी स्टोअरेज वाय-फाय मॉडेलचे मूल्य २९,९०० तर ३२ जीबी स्टोअरेज वाय-फाय+सेल्युलर आवृत्ती ४०,९०० रूपयात लाँच करण्यात आली आहे. ग्राहकांना हे मॉडेल स्पेस ग्रे, सिल्व्हर आणि गोल्ड या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये ३० सप्टेंबरपासून मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here