आयफोन ११ मालिकेचे अनावरण : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

अ‍ॅपलने आपल्या आजच्या कार्यक्रमात आयफोनच्या नवीन आवृत्तीची घोषणा करण्यात आली असून यात आयफोन ११ आणि ११ प्रो व ११ प्रो मॅक्स या मॉडेल्सचे अनावरण करण्यात आले.

अ‍ॅपलतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या लाँचींग कार्यक्रमात विविध उपकरणांची घोषणा होणार असल्याचे अपेक्षित होते. विशेष करून यातील आयफोनच्या नवीन आवृत्तीबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाच आयफोन ११ व ११ प्रो आणि ११ प्रो मॅक्स या मॉडेल्सची घोषणा करण्यात आली.

आयफोनमध्ये अतिशय दर्जेदार कॅमेरा असतो. हाच लौकीक कायम राखत आयफोन ११ या मॉडेलमध्येही अतिशय उत्तम असा कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यातील एक कॅमेरा हा वाईड अँगल लेन्सने युक्त आहे. या कॅमेर्‍यांच्या मदतीने फोर-के क्षमतेच्या व्हिडीओचे चित्रीकरण शक्य आहे. याशिवाय यात नाईट मोड व टाईम लॅप्स व्हिडीओसारखे फिचर्सही देण्यात आलेले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ट्रु-डेप्थ या प्रणालीने युक्त असणारा १२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यातील डिस्प्ले ५.८ इंच आकारमानाचा असून तो डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. आयफोन ११ या मॉडेलमध्ये ए१३ बायोनिक हा अद्ययावत प्रोसेसर प्रदान करण्यात आलेला आहे. स्मार्टफोनमधील हा सर्वात गतीमान प्रोसेसर असल्याचा दावा अ‍ॅपलच्या या कार्यक्रमात करण्यात आला. यातील बॅटरी ही गत वर्षी लाँच केलेल्या आयफोन १०एक्सआर या मॉडेलपेक्षा एक तास जास्त बॅकअप देणारी असणार आहे. आयफोन ११ या मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ६९९ डॉलर्सपासून सुरू होणारे आहे.

दरम्यान, याच कार्यक्रमात आयफोन ११ प्रो या मॉडेल्सचे अनावरण करण्यात आले. नावातच नमूद असल्यानुसार यात आयफोन ११ या मॉडेलपेक्षा उच्च श्रेणतील फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात ५.८ आणि ६.५ इंच आकारमानांचा सुपर रेटीना एचडीआर डिस्प्ले दिलेला आहे. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलेला असून यातील तिन्ही कॅमेरे १२ मेगापिक्सल्सचे आहेत. यातील एक टेलीफोटो, दुसरी वाईड तर तिसरी अल्ट्रा वाईड लेन्स आहे. यांच्या मदतीनेही फोर-के क्षमतेचे चित्रीकरण करता येईल. यात फोर एक्स इतका ऑप्टीकल झूम प्रदान करण्यात आला आहे. याच्या कॅमेर्‍यांमध्ये डीप फ्युजन हे विशेष फिचर दिले असून याच्या अंतर्गत युजरने क्लिक करण्याच्या क्षणापर्यंतच नऊ प्रतिमा घेण्यात येतील. तर आयफोन ११ प्रो मॅक्स या मॉडेलमधील सर्व फिचर्स प्रो मॉडेलनुसार असून यात मोठा डिस्प्ले दिलेला आहे. आयफोन प्रो या मॉडेल्सचे मूल्य ७९९ तर आयफोन ११ प्रो मॅक्स मॉडेलचे मूल्य १०९९ डॉलर्सपासून सुरू होणारे आहे.

आयफोनच्या विविध व्हेरियंटस्चे भारतातील मूल्य खालीलप्रमाणे आहे.

आयफोन ११

१) ६४ जीबी स्टोअरेज – ६४,९९०
२) १२८ जीबी स्टोअरेज – ६९,९९०
३) २५६ जीबी स्टोअरेज – ७९,९९०

आयफोन ११ प्रो

१) ६४ जीबी स्टोअरेज – ९९,९९०
२) २५६ जीबी स्टोअरेज – १,१३,९००
३) ५१२ जीबी स्टोअरेज – १,३१,९००

आयफोन ११ प्रो मॅक्स

१) ६४ जीबी स्टोअरेज – १,०९,९००
२) २५६ जीबी स्टोअरेज – १,२३,९००
३) ५१२ जीबी स्टोअरेज – १,४१,९००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here