आयफोन एसई-२०२० मॉडेल लाँच : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

अ‍ॅपलने आयफोन एसई-२०२० हा स्मार्टफोन लाँच केला असून तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आलेल्या मॉडेलमध्ये अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

अ‍ॅपल कंपनी आयफोनची नवीन आवृत्ती लाँच करणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. याचे अनेक लीक्सदेखील समोर आले होते. कोरोनाच्या प्रकोपामुळे हे लाँचींग पुढे ढकलले जाईल अशी देखील शक्यता होती. मात्र असे न होता अ‍ॅपलने आयफोन एसई-२०२० हे नवीन मॉडेल जागतिक बाजारपेठेत लाँच करण्याची घोषणा केली आहे. याचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य ३९९ डॉलर्स असून भारतात याचे विविध व्हेरियंटस् ४२,५०० रूपयांपासून सुरू होणारे आहेत.

आयफोन एसई-२०२० हे मॉडेल नावातच नमूद असल्यानुसार आधीच बाजारपेठेत उपलब्ध असणार्‍या एसई या मॉडेलची पुढील आवृत्ती आहे. यातील बहुतांश फिचर्स हे मूळ मॉडेल नुसारच आहेत. यात ४.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १३३४ बाय ७५० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडीआर १० व डॉल्बी व्हीजन या तंत्रज्ञानाने युक्त आहे. यात टच आयडी हे फिचर देखील दिलेले आहे. या मॉडेलमध्ये ए३ हा प्रोसेसर दिलेला आहे.

आयफोन एसई-२०२० या मॉडेलच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यात मोनोक्युलर डेप्थ सेन्सींग तंत्रज्ञानासह पोर्ट्रेट मोड प्रदान करण्यात आला असून याच्या मदतीने अतिशय उत्तम प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यातून फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण देखील करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ७ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. यात वायरलेस चार्जींगची क्षमता असणारी बॅटरी दिलेली आहे. हे मॉडेल ६४, १२८ आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या तीन पर्यायांमध्ये ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. तर हे मॉडेल आयओएस १३ या आवृत्तीवर चालणारे आहे.

आयफोन एसई-२०२० या मॉडेलचे ६४, १२८ आणि २५६ जीबी स्टोअरेजचे भारतातील मूल्य अनुक्रमे ४२,५००; ४७,८०० आणि ५८,३०० रूपये इतके असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. याच्या उपलब्धतेबाबत सध्या तरी माहिती देण्यात आली नसली तरी याची काही दिवसांमध्ये घोषणा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here