जिओमार्टची एंट्री : जाणून घ्या सर्व माहिती

0

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या बहुप्रतिक्षित ईकॉमर्स सेवेला जिओमार्ट या नावाने लाँच केले असून यात देशभरातील रिटेलर्सला तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडण्याची तयारी करण्यात आली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी २०१८ साली जिओफोनची घोषणा करतांनाच आपली कंपनी ई-कॉमर्सच्या क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची माहिती दिली होती. या घोषणेनंतर तब्बल दीड वर्षांनी रिलायन्सने जिओमार्ट या नावाने ही सेवा लाँच केली आहे. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई, कल्याण आणि ठाणे या शहरांमध्ये जिओमार्ट सुरू करण्यात आले आहे. या सेवेत फिजीटल म्हणजेच फिजीकल+डिजीटल असा मिलाफ करण्यात आला आहे. जिओमार्ट हे ओ-टू-ओ म्हणजेच ऑनलाईन-टू-ऑफलाईन या प्रकारात ग्राहकांना किराणा वस्तू थेट घरपोच देणार आहे.

जिओमार्ट सेवेच्या अंतर्गत जिओ युजर्सला नोंदणी करून एक अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करावे लागणार आहे. यानंतर संबंधीत ग्राहक त्याला हव्या असणार्‍या किराणा वस्तूंची ऑर्डर देऊ शकतो. यासाठी जिओमार्टच्या अ‍ॅपवर तब्बल ५० हजार प्रॉडक्टची लिस्टींग करण्यात आलेली आहे. यातून हव्या त्या वस्तू निवडून याची अ‍ॅपवर ऑर्डर द्यावी लागणार आहे. ही ऑर्डर संबंधीत ग्राहकाला जवळ असणार्‍या व अर्थातच जिओमार्टशी संलग्न असणार्‍या किराणा दुकानाकडे फॉरवर्ड करण्यात येईल. यानंतर कंपनीची डिलीव्हरी सिस्टीम त्या दुकानावरून संबंधीत ऑर्डरमध्ये दिलेले प्रॉडक्ट घेऊन ग्राहकांना थेट घरी पोहचवतील.

जिओमार्टमधील अनेक बाबी या लक्षणीय आहेत. एक तर यात कोणत्याही प्रकारच्या मिनीमम (किमान )ऑर्डरची मर्यादा टाकण्यात आलेली नाही. तसेच यात नो क्वेश्‍चन आस्क रिटर्न पॉलिसी असल्याने ग्राहक त्याला नकोसे वाटणारे प्रॉडक्ट सहजपणे परत करू शकतो. तर ग्राहकाला एक्सप्रेस डिलीव्हरी अर्थात अतिशय जलद गतीने वस्तू घरपोच मिळणार असल्याची गॅरंटी देण्यात आलेली आहे. दरम्यान, नवीन ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी जिओमार्टने आक्रमक रणनिती आखली असून प्रारंभी तीन हजार रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

जिओमार्टमध्ये किराणा दुकानदारांना पॉईंट-टू-सेल म्हणजे पीओएस मशीन लावण्यात येणार आहे. हे मशीन कंपनीतर्फे किराणा दुकानदारांना देण्यात येणार असून याच्या मदतीने ते अत्याधुनीक पध्दतीत व्यापार करू शकतील. एका वर्षात देशभरातील सुमारे ३० लाख किराणा दुकानदारांना आपल्या या नवीन मंचासोबत जोडण्याचे उद्दीष्ट जिओमार्टने ठेवले आहे. जिओमार्टला रिलायन्सने ‘देश की नई दुकान’ अशी दिलेली कॅचलाईन ही या अर्थाने बोलकी अशीच आहे.

सध्या किराणा वस्तूंच्या ऑनलाईन व्यवसायामध्ये ग्रोफर व बिगबास्केट आदींसारख्या लहान कंपन्या असून मोठ्या पातळीवर फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया कार्यरत आहेत. या सर्व कंपन्यांना तगडे आव्हान देण्याची तयारी रिलायन्सने सुरू केल्याचे संकेत यातून मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here