झूमला टक्कर देण्यासाठी जिओमीट मैदानात !

0

व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये आघाडीवर असणार्‍या झूमला टक्कर देण्यासाठी रिलायन्सने आपल्या बहुप्रतिक्षित जिओमीट या सेवेला लाँच केल्याने या क्षेत्रातील स्पर्धा रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरं तर, रिलायन्स जिओची जिओमीट या नावाचे बीटा पध्दतीत उपलब्ध असणारी व्हिडीओ कॉन्फरन्सींग सेवा आता सर्व युजर्ससाठी खुली करण्याची घोषणा आधीच करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमिवर, आता ही सेवा अधिकृतपणे सर्वांना उपलब्ध करण्यात आलेली आहे. कुणीही याला संगणक वा लॅपटॉप/टॅब्लेटसह स्मार्टफोनवरून वापरू शकतो.सध्या टेकविश्‍वात व्हिडीओ कॉन्फरन्सींगशी संबंधीत सेवांना प्रचंड प्रमाणात असलेल्या मागणीची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे बहुतांश कंपन्यांनी यावरच आपले लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता सर्व कंपन्या ग्रुप व्हिडीओ कॉलींग/कॉन्फरन्सींग सेवांकडे वळल्याचेही दिसून येत आहे. यात आता जिओची भर पडणार आहे.

जिओमीट बाबत आधीच घोषणा करण्यात आली असून ही सेवा अँड्रॉइड व आयओएस युजर्ससाठी प्रयोगात्मक म्हणजेच बीटा अवस्थेत उपलब्ध होती. तथापि, आता जिओमीट हे सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. जिओमीटमध्ये अनेक सरस फिचर्स आहेत. यात झूम अ‍ॅपप्रमाणे एकाच वेळी १०० युजर्सशी संवाद साधता येणार आहे. यात एचडी कॉलींगची व्यवस्थादेखील आहे. ही सेवा अँड्रॉइड व आयओएस सोबतच डेस्कटॉप युजर्ससाठी विंडोज आणि मॅकओएस या प्रणालींसाठी उपलब्ध राहणार आहे. गुगल क्रोम व मोझीला फायरफॉक्स या ब्राऊजर्समध्ये जिओमीट वापरता येणार आहे.

सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये झूम हे अ‍ॅप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तथापि, हे अ‍ॅप युजरची गोपनीय माहिती चोरत असल्याचा अनेकदा आरोप करण्यात येत असतो. यामुळे याचा शासकीय वापर आधीच थांबविण्यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता जिओमीट हे पूर्णपणे भारतीय अ‍ॅप आता कॉन्फरन्सींसाठी उपलब्ध करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. याचा युजर इंटरफेस हा अतिशय सोपा आहे. झूम प्रमाणे कुणीही ई-मेल अथवा मोबाईल क्रमांकाच्या मदतीने याला लॉगीन करू शकतो. यात एचडी क्षमतेच्या कॉन्फरन्सींगची सुविधा आहे. तर यात देखील एकाच वेळी १०० युजर्स हे एकमेकांशी संवाद साधू शकतात. ही सेवा देखील वापरण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. तर याच्या मदतीने युजर दिवसातून कितीही वेळा मिटींग घेऊ शकतात. यामध्ये होस्ट आणि गेस्ट या दोन्ही स्वरूपात मिटींग जॉईन करता येणार आहे. यामध्ये शेडयूल मिटींग,इनव्हाईट, स्क्रीन शेअरिंग आदींसारखे फिचर्स देखील दिलेले आहेत. सध्या तरी यात पेड सेवांबाबत काहीही माहिती दिलेली नाही. तथापि, लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

सध्या चीन व एकंदरीतच विदेशी डिजीटल सेवा पुरवठादारांबाबतची भावना तीव्र झालेली असतांना जिओमीटची झालेली एंट्री ही भारतीय युजर्सला एक सक्षम पर्याय उपलब्ध करणारी आहे. यामुळे याला अल्पावधीतच उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यास नवल वाटता कामा नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here