किया मोटर्स या कंपनीची मेड इन इंडिया सेल्टोस ही एसयुव्ही भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आली असून याचे मूल्य ९.६९ लाखांपासून सुरू होणारे आहे.
किया मोटर्स ही कंपनी भारतात लवकरच मॉडेल सादर करणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. यावर शिक्कामोर्तब करत कियाने सेल्टोस ही एसयुव्ही ग्राहकांना सादर केली आहे. याच्या विविध व्हेरियंटस्चे एक्स-शोरूम मूल्य ६.६९ ते १५.९९ लाखांच्या दरम्यान आहे. यामध्ये बीएस६ या मानकानुसार विकसित करण्यात आलेल्या १.५ लीटर पेट्रोल; १.४ लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल आणि १.५ लीटर व्हीजीटी डिझेल या तीन इंजनांचा पर्याय दिलेला आहे. तर यात मॅन्युअल आणि अॅटोमॅटीक या दोन्ही गिअर्सचे पर्याय दिलेले आहेत.
किया सेल्टोस या मॉडेलचे बाह्यांग अतिशय आकर्षक असे असून याला स्पोर्टी लूक प्रदान करण्यात आलेला आहे. यात नवीन ग्रील, एलईडी हेडलॅप्स, एलईडी डे-टाईम रनींग लँप्स, फॉग लँप्स, टेल लाईटस् आदींचा समावेश करण्यात आलेला आहे. अंतर्भागाचा विचार केला असता, सेल्टोसमध्ये ८ स्पीकर्सने युक्त असणारी बोस कंपनीची अद्ययावत ध्वनी प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. याला हेडस् अप डिस्प्ले या प्रकारातील टचस्क्रीन डिस्प्लेची जोड दिलेली आहे. हा डिस्प्ले इन्फोटेनमेंट प्रणालीशी संलग्न करण्यात आलेला आहे. याशिवाय, यात क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आदी फिचर्सदेखील दिले आहेत. दरम्यान, या मॉडेलमध्ये युव्हीओ कनेक्ट सिस्टीमशी संबंधीत ३७ विविध फिचर्स प्रदान करण्यात आलेले आहेत. अर्थात ही कनेक्ट एसयुव्ही होय. या प्रणालीच्या अंतर्गत नेव्हिगेशन, सेफ्टी अँड सिक्युरिटी, व्हेईकल मॅनेंजमेंट, रिमोट कंट्रोल आणि कनव्हिनियन्स या पाच प्रकारांमध्ये तब्बल ३७ फिचर्स दिलेले आहेत. या फिचर्समध्ये एआय व्हाईस कमांड, वाहन चोरी विरोधक प्रणाली, एसओएस अलर्ट आदींचा समावेश आहे.
हुंदाई क्रेटा, टाटा हॅरीअर, एमजी व्हेक्टर व रेनो कॅप्चर आदींसारख्या मॉडेल्सला किया सेल्टोस आव्हान उभे करणार का ? याबाबत आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.