एलजीचा ड्युअल डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन दाखल

0

एलजी कंपनीने ड्युअल डिस्प्लेची सुविधा असणारा जी८एक्स थीनक्यू हा स्मार्टफोन बाजारपेठेत सादर केला असून यात अनेक सरस फिचर्स आहेत.

एलजी कंपनीने आयएफए-२०१९ या परिषदेत जी८एक्स थीनक्यू या मॉडेलचे अनावरण केले होते. आता हेच मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर केले आहे. शीर्षकात नमूद केल्यानुसार यात ड्युअल डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ६.४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा फुल व्हिजन या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. याच्या जोडीला यात याच आकारमानाचा नवीन डिस्प्ले दिलेला असून तो मूळ स्मार्टफोनला संलग्न करता येतो. यात क्वॉलकामॅचा स्नॅपड्रॅगन ८५५ हा प्रोसेसर आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे.

एलजी जी८एक्स थीनक्यू या स्मार्टफोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. याच्या अंतर्गत १२ आणि १३ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे दिलेले असून यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा आणि व्हिडीओ घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. क्विक चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर दिले असून हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहे. याचे मूल्य ४४,९९९ रूपये असून देशभरातील रिटेल स्टोअर्समधून याला उपलब्ध करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here