एलजीचे ग्राम मालिकेत दोन नवीन लॅपटॉप

0

एलजी कंपनीने ग्राम या मालिकेत अनुक्रमे १७ आणि १४ इंची डिस्प्ले असणारे दोन लॅपटॉप लाँच केले असून याचे अनावरण करण्यात आले आहे.

एलजी कंपनीने ग्राम १७ आणि ग्राम टू-इन-वन हे दोन लॅपटॉप बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. यातील पहिले मॉडेल हे १७ इंची आकारमानाचे नियमित लॅपटॉप आहे. तर दुसरे मॉडेल हे हायब्रीड अर्थात लॅपटॉपसोबत टॅबलेट म्हणून वापरण्याजोगे मॉडेल आहे. यातील पहिल्या मॉडेलमधील १७ इंची डिस्प्ले हा डब्ल्यूक्यूएक्सजीए म्हणजे २५६० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा असून याचा अस्पेक्ट रेशो १६:१० असा आहे. यामध्ये इंटेलचे आठव्या पिढीतील अतिशय गतीमान प्रोसेसर देण्यात आलेले आहे. याच्या विविध व्हेरियंटमध्ये १६ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोअरेजचे पर्याय दिले आहेत. यामध्ये ७२ वॅट क्षमतेची बॅटरी दिली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास १९.५ तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात थंडरबोल्ट ३ पोर्ट दिलेले आहे. यामुळे अन्य उपकरणांना चार्ज करण्यासह डाटा ट्रान्सफर सुलभपणे करता येणार आहे. सुरक्षेसाठी यात फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले आहे. तर यात डीटीएस सराऊंड साऊंडच्या हेडफोनचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.

दरम्यान, ग्राम टू-इन-वन या मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि टचस्क्रीन या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यावर सुरक्षेसाठी कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण असणार आहे. हे मॉडेल अमेरिकन लष्कराच्या मानकानुसार तयार करण्यात आले आहे. यामुळे याला कोणत्याही वातावरणात वापरणे शक्य असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यातदेखील ७२ वॅट क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. यात ८ व १६ जीबी रॅमचे पर्याय असून इनबिल्ट स्टोअरेज २५६ जीबी असणार आहे. हे मॉडेल लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे.

एलजी कंपनीने आपल्या या दोन्ही मॉडेल्सचे अनावरण केले असले तरी याच्या उपलब्धतेबाबत माहिती दिलेली नाही. तथापि, लवकरच हे मॉडेल प्रत्यक्षात ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here