एलजी कंपनीने डब्ल्यू या नवीन मालिकेत तीन नवीन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून यात किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत.
भारतीय बाजारपेठेत प्राथमिक आणि मध्यम किंमतपट्टयातील स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विकले जातात. ही बाब लक्षात घेत, एलजी कंपनीने डब्ल्यू १०, डब्ल्यू ३० आणि डब्ल्यू ३० प्रो हे तीन स्मार्टफोन्स ग्राहकांना सादर केले आहेत. यातील लक्षणीय बाब म्हणजे एलजीने आजवर प्रिमीयम म्हणजे उच्च श्रेणीतच बहुतांश मॉडेल्स लाँच केले होते. मात्र अलीकडच्या काळात या कंपनीचे कोणतेही मॉडेल चांगले यशस्वी झाले नाही. यामुळे कंपनीने आपली रणनिती बदलल्याचे दिसून येत आहे. यातील एलजी डब्ल्यू १० या मॉडेलचे मूल्य ८९९९ तर डब्ल्यू ३० मॉडेलचे मूल्य ९,९९९ रूपये आहे. तर डब्ल्यू ३० प्रो हे मॉडेल लवकरच उपलब्ध करण्यात येणार असून याच्या फिचर्सची माहितीसुध्दा देण्यात आलेली नाही.
एलजी डब्ल्यू ३० आणि डब्ल्यू १० या मॉडेल्समध्ये अनुक्रमे ६.२७ आणि ६.२१ इंच आकारमानांचे आणि एचडी प्लस म्हणजे १५४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतांचे डिस्प्ले देण्यात आले आहेत. दोन्हींमध्ये हेलीओ पी २२ हा प्रोसेसर दिलेला आहे. दोन्हींची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून तो वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. एली डब्ल्यू ३० या मॉडेलच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यामध्ये १२, १३ आणि २ मेगापिक्सल्सच्या तीन कॅमेर्यांचा समावेश आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल्सचा आहे. तर डब्ल्यू १० या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असून यात १३ आणि ५ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्यांचा समावेश आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा हा ८ मेगापिक्सल्सचा देण्यात आलेला आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहेत.