सावधान व्हाटसअ‍ॅपच्या चॅट इनव्हाईट लिंकचा होऊ शकतो गैरवापर !

0

अनेक खासगी व्हाटसअ‍ॅप ग्रुपच्या चॅट इनव्हाईट लिंक्सचे गुगलवर लिस्टींग होत असल्याने याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

कुणीही आपल्या व्हाटसअ‍ॅप ग्रुपची इनव्हाईट लिंक तयार करू शकतो. या माध्यमातून अन्य युजर संबंधीत ग्रुपला जुडू शकतो. जगभरात कोट्यवधी व्हाटसअ‍ॅप ग्रुप्सच्या इनव्हाईट लिंक तयार करण्यात आल्या असून गुगलवर याचे इंडेक्सींग करण्यात आले आहे. गुगल सर्चमध्ये आपण कोणत्याही विषयाशी संबंधीत व्हाटसअ‍ॅप ग्रुपच्या लिंक्स शोधू शकतो. यात खुल्या ग्रुपसोबत प्रायव्हेट ग्रुपच्या लिंकदेखील दिसत असल्याने संबंधीत ग्रुप्सची गोपनीयता धोक्यात आल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जॉर्डन विल्डोन या पत्रकाराने ही बाब पहिल्यांदा जगासमोर आणली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या संदर्भात मदरबोर्ड या टेक पोर्टलने अधिक तपासणी केली असता, गुगलवर कुणीही कोणत्याही टर्मशी संबंधीत व्हाटसअ‍ॅपच्या ग्रुपची चॅट इनव्हाईट लिंक पाहू शकतो. यावर क्लिक करून अर्थातच संबंधीत ग्रुपमध्ये प्रवेश शक्य असल्याचेही त्यांना दिसून आले आहे. हा सर्व प्रकार अतिशय संवेदनशील असून यामुळे खासगी ग्रुपची माहिती खुली होत असल्याची बाब अतिशय गंभीर असल्याचे मत जॉर्डन विल्डोन यांनी व्यक्त केले आहे. व्हाटसअ‍ॅपवर एंड-टू-एंड एनक्रिप्शनस असून यावरील माहितीचे आदानप्रदान हे अभेद्य सुरक्षा कवचाने युक्त असल्याचा दावा कंपनीतर्फे नेहमी करण्यात येतो. मात्र ग्रुपची माहिती गुगलवर कुणीही बघून यात प्रवेश करू शकत असल्याने हे सुरक्षा कवच निकामी ठरत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या सर्व प्रकारावर व्हाटसअ‍ॅपच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देतांना ग्रुप इनव्हाईटची लिंक गुगलवर लिस्ट होणे हा फारसा गंभीर प्रकार नसल्याचा दावा केला आहे. यासोबत त्यांनी गुगलसोबत चर्चा करून व्हाटसअ‍ॅपच्या चॅट ग्रुप इनव्हाईट लिंकची लिस्टींग न करण्याचे ठरविले आहे. तथापि, बिंगसह अन्य सर्च इंजिन्सवर अद्यापही या लिंक सहजपणे शोधता येत असल्याची बाब लक्षणीय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here