मारूती सुझुकी एक्सएल ६ लाँच : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

मारूती सुझुकीने आज आपले बहुप्रतिक्षित एक्सएल ६ हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

सध्या वाहनांच्या बाजारपेठेत प्रचंड मंदी असल्याने उत्पादक धास्तावले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आज मारूती सुझुकी कंपनीने एक्सएल ६ हे मॉडेल लाँच केले. हे एमपीव्ही या प्रकारातील वाहन असून याची आसन क्षमता सहा आहे. कंपनीच्या आधीच लोकप्रिय असणार्‍या एर्टीगा मॉडेलवर याची बांधणी करण्यात आली असून याला कंपनीच्या नेक्सा या शॉपीजच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. वर नमूद केल्यानुसार यात सहा जणांची आसन व्यवस्था असून या सीटस् तीन रांगांमध्ये देण्यात आलेल्या आहेत. यात स्टाईल व कंफर्ट या बाबींना लक्षात घेऊन तसे फिचर्स दिलेले आहेत.

यात १.५ लीटर क्षमतेची बीएस ६ या मानकावर तयार करण्यात आलेले पेट्रोल इंजिन असून यात मॅन्युअल आणि अ‍ॅटोमॅटीक या दोन्ही प्रकारातील गिअर्सची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. यात समोर चार एलईडी लँपयुक्त लाईट प्रणाली दिलेली आहे. यात नवीन ग्रील, टेललॅप्स आदी प्रदान करण्यात आले आहेत. अंतर्गत भागाचा विचार केला असता यात दर्जेदार इंटेरीयर दिलेले आहे. यात ७.० इंच आकारमानाचा टचस्क्रीन डिस्प्ले असणारी अद्ययावत इन्फोटेनमेंट सिस्टीम दिलेली असून यात अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्लेसह मारूती सुझुकीच्या स्मार्ट प्ले प्रणालीचा सपोर्ट दिलेला आहे. यामध्ये इबीडीयुक्त अँटी लॉक ब्रेकींग सिस्टीम (एबीएस) दिलेली आहे. तर सुरक्षेसाठी यातील ड्युअल एयरबॅग्ज प्रदान करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित फिचर्समध्ये कि-लेस एंट्री, क्रूझ कंट्रोल, रिअर पार्कींग सेन्सर व कॅमेरा, सीट वॉर्नींग सिस्टीम, अलॉय व्हील्स आदींचा समावेश आहे.

मारूती सुझुकी एक्सएल ६ हे मॉडेल झीटा मॅन्युअल ट्रान्समीशन-९,७९,६८९; झीटा अ‍ॅटोमॅटीक ट्रान्समीशन- १०,८९,६८९ तर अल्फा मॅन्युअल ट्रान्समीशन-१०,३६,१८९ व अल्फा अ‍ॅटोमॅटीक ट्रान्समीशन-११,४६,१८९ या चार विविध व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here