एमजी हेक्टर एसयुव्हीचे अनावरण : जाणून घ्या सर्व फिचर्स !

0

एमजी मोटर्स इंडियाने एमजी हेक्टर या आपल्या बहुप्रतिक्षित एसयुव्हीचे अनावरण केले असून यात अनेक भन्नाट फिचर्स आहेत.

एमजी मोटर्सने एमजी हेक्टर भारतात सादर करण्याची घोषणा कधीपासूनच केली असून गत अनेक दिवसांपासून याच्या प्रसारमाध्यमांमधून जाहिरातीदेखील सुरू झाल्या आहेत. यामुळे या मॉडेलबाबत प्रचंड औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले असतांनाच या मॉडेलचे अनावरण करण्यात आले. अर्थात, यामुळे या मॉडेलचे सर्व फिचर्स जाहीर करण्यात आले असून विविध व्हेरियंटच्या मूल्याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. साधारणपणे जून महिन्याच्या प्रारंभी याच्या अगावू नोंदणीस सुरूवात होणार आहे.

एमजी हेक्टर या मॉडेलमध्ये तीन इंजिन्सचा पर्याय आहे. यात पेट्रोल, डिझेल व पेट्रोल हायब्रीड यांचा समावेश आहे. यात १.५ लीटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन असून दुसर्‍या व्हेरियंटमध्ये याला ४८ व्होल्ट बॅटरीची जोड देत हायब्रीड मॉडेल तयार करण्यात आले आहे. तर यातील डिझेल इंडिन हे २.० लीटर क्षमतेचे व एफसीए मल्टीजेट या प्रकारातील आहे. याला ६ स्पीड मॅन्युअल तसेच डीसीटी गिअर्सचा पर्याय देण्यात आला आहे. हे मॉडेल स्टाईल, सुपर, स्मार्ट आणि शार्प या चार पर्यायांमध्ये तसेच कँडी व्हाईट, अरोरा सिल्व्हर, स्टारी ब्लॅक, बुरगुंडी रेड आणि ग्लेझ रेड या पाच रंगांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

एमजी हेक्टर या मॉडेलमध्ये अनेक सरस फिचर्स आहेत. यात पॅनोरामीक सनरूफ, रेन सेन्सींग वायफर्स, अ‍ॅटोमॅटीक हेडलँप्स, चार बाजूंनी इलेक्ट्रॉनिक पध्दतीत अ‍ॅडजस्ट करता येणार्‍या पुढील सीटस्, ३६० अंशातील कॅमेरा, मुड लँप्स आदींचा समावेश आहे. तथापि, यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे यातील आयस्मार्ट ही अत्युच्च तंत्रज्ञानाने युक्त असणारी प्रणाली होय. यात १०.४ इंच आकारमानाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली देण्यात आली आहे. यात अँड्रॉइड ऑटो व अ‍ॅपल कार प्ले अ‍ॅपच्या मदतीने स्मार्टफोन कनेक्ट करता येणार आहे. विशेष म्हणजे यात सीमकार्डची सुविधाही दिलेली असून याच्या मदतीने संपूर्ण सिस्टीमलाच नेटवर्कचा लाभ मिळणार आहे. हे सीमकार्ड ५-जी तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारे आहे. यामुळे गतीमान इंटरनेटच्या मदतीने रिअल टाईम नेव्हिगेशन, एंटरटेनमेंट, गेमींग आदींचा वापर करता येणार आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात व्हाईस असिस्टचा वापर केलेला आहे. परिणामी कारच्या विविध फंक्शन्सचा वापर हा व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीचा उपयोग करून करता येईल. याची चुणूक एमजी हेक्टरच्या जाहिरातीतून आपल्याला दिसून आलेली असेलच. यात हॅलो एमजी हा शब्द वापरून तब्बल १०० व्हाईस कमांडचा वापर करता येणार आहे. तसेच या मॉडेलसाठी आयस्मार्ट हे अ‍ॅप विकसित करण्यात आले असून याच्या मदतीने दुरवरून कार लॉक-अनलॉक करणे शक्य आहे.

एमजी हेक्टरचे अनावरण करण्यात आले तरी याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. जूनमध्ये हे मॉडेल अधिकृतपणे लाँच झाल्यानंतर ही माहिती देण्यात येईल. याचे मूल्य १५ ते २० लाखांच्या दरम्यान असेल असे मानले जात आहे. पहिल्यांदा याचे पाच आसन क्षमता असणारे मॉडेल सादर करण्यात आलेले आहे. तथापि, यात सेव्हन सीटर व्हेरियंटदेखील लवकरच सादर होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारपेठेत लोकप्रिय असणार्‍या टाटा हॅरीयर, जीप कंपास आदी मॉडेल्सला एमजी हॅरीयर आव्हान देणार का ? याचे आता ऑटो विश्‍वाचे लक्ष लागणार आहे.

पहा : एमजी हेक्टरची माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here