आता वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंटसाठी एकच अ‍ॅप

0

मायक्रोसॉफ्टने आपले ऑफीस अ‍ॅप लाँच केले असून यात वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट या तिन्ही सेवांना एकत्र करण्यात आले आहे.

मायक्रोसॉफ्ट ऑफीस सुटच्या अंतर्गत येणारे वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट आदी टुल्स अतिशय लोकप्रिय आहेत. जगभरात याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता या तिन्ही टुल्सला एकाच ठिकाणी वापरण्याची सुविधा युजर्सला मिळणार आहे. कारण मायक्रोसॉफ्टने आता ऑफीसचे स्वतंत्र अँड्रॉइड आणि आयओएस अ‍ॅप सादर केले आहे. यात मायक्रोसॉफ्टच्या या तिन्ही सेवांना एकाच ठिकाणी वापरता येणार आहे. याआधी वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट हे तीन स्वतंत्र अ‍ॅप इन्स्टॉल करून वापरावे लागत होते. तथापि, आता युजर्सला एकाच अ‍ॅपमध्ये ही सुविधा मिळणार आहे. या माध्यमातून कंपनीने कंटेंट क्रियेशनची सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेष करून कोणतेही डॉक्युमेंट स्कॅन करून त्याला पीडीएफ म्हणून वापरण्यासारख्या काही कॉमन कामांना या तिन्ही टुल्सच्या माध्यमातून अतिशय जलद गतीने वापरता येत असल्याने युजर्सला याचा लाभ होणार आहे. अँड्रॉइड प्रणालीसाठी हे अ‍ॅप प्रयोगात्मक अवस्थेत सादर करण्यात आले असून यासाठी साईन-अप करण्याची आवश्यकता आहे. तर आयओएस प्रणालीच्या टेस्ट फ्लाईट हा सेवेसाठी साईन-अप केलेल्यांनाच याला वापरता येणार आहे. अर्थात, दोन्ही प्रणालींसाठी हे अ‍ॅप प्रयोगात्मक अवस्थेत असले तरी याला सर्व युजर्ससाठी लवकरच लाँच करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान, यासोबत मायक्रोसॉफ्टने आपल्या एज या ब्राऊजरचा विस्तारदेखील केला आहे. आता हे ब्राऊजर विंडोजसह अँड्रॉइड, आयओएस आणि मॅकओएस या प्रणालींसाठीही उपलब्ध करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here