मोटोरोला कंपनीने भारतीय बाजारपेठेत स्मार्ट टिव्हींची मालिका सादर केली असून याला फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मोटोरोला कंपनीच्या स्मार्ट टिव्हीबाबत प्रचंड औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले होते. या पार्श्वभूमिवर, आज मोटोरोलाने ही मालिका सादर केली असून यात एकूण सात विविध मॉडेल्सचा समावेश आहे. यामध्ये एचडी रेडी, फुल एचडी आणि फोर-के या तीन क्षमतांमधील मॉडेल्सचा समावेश आहे. यात ३२ इंची ते ६५ इंची आकारमानांचे टिव्ही आहेत. या स्मार्ट टिव्ही मालिकेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण फिचर्स आहेत. यात याचा लूक हा अतिशय आकर्षक असून यात बॉर्डरलेस डिस्प्ले प्रदान करण्यात आलेला आहे. यात मोटोरोलाने विकसित केलेली अँफी साऊंड एक्स तसेच डॉल्बी अॅटमॉस व डीटीएस या प्रणाली असल्याने ग्राहकांना उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. यासोबत ब्लु-टुथ गेमींग पॅड दिले असून याच्या मदतीने युजर गेमिंगचा आनंद घेऊ शकेल.
मोटोरोलाचे स्मार्ट टिव्ही हे अँड्रॉइड ९ या आवृत्तीवर चालणारे असून यात स्वतंत्र गुगल प्ले स्टोअर असणार आहे. यातून युजर हवे ते अॅप इन्स्टॉल करून याचा वापर करू शकतो. कनेक्टीव्हिटीसाठी यात ब्ल्यु-टुथ आणि वाय-फायसह एचडीएमआय, युएसबी आदी पर्याय दिलेले आहेत. या मालिकेतील सातही टिव्हींचे मूल्य १३,९९९ ते ६४,९९९ रूपयांच्या दरम्यान असून याला २९ सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात येणार आहे.